पंढरपूर/वार्ताहर
उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने सर्वत्र आंदोलन तीव्र केल्याने त्याचा फटका सर्वानाच बसला. ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने दोनशे चालक व वाहक यांना दिवाळी पंढरपूर एस.टी. आगारातच साजरी करावी लागली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सदुभाऊ खोत यांना अटक केल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एस.टी. लाच लक्ष केले, तर ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडले. यामुळे वातावरण तंग बनले. काही ठिकाणी एस.टी. बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पंढरपूरमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा येथे थांबवण्यात आल्या होत्या.
विविध आगारातील सुमारे २२५ वाहक-चालक अडकून पडले. परंतु, पंढरपूर आगारप्रमुख हरिभाऊ साळुंखे, त्यांचे सहकारी यांनी या मुक्कामी असेलल्या सर्वाच्या भोजनाची सोय केली. ऐन दिवाळीतच या सर्वाना येथे अडकून पडल्याने दिवाळी सणावर जे भीतीचे सावट होते ते दूर करून गरम पाण्यासह सर्व सोय करून त्यांना दिवाळीच्या सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला.
इतर वेळी प्रवाशांच्या सेवेसाठी बस घेऊन मार्गस्थ होणारे पंढरपूरचे बस कर्मचारी हे आपल्या सहकाऱ्यांना अगत्याचे पाहुणे समजून दोन दिवस पाहुणचार केला. जे वाहक, चालक एस.टी. घेऊन पंढरीत येऊन थोडा वेळ थांबून पुढे मार्गस्थ होणारे हे पंढरीत शेतकरी संघटनेमुळे
अडकून पडले अन् पंढरपूर आगारातील कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेले होते.
एस.टी. बसेस बंदमुळे मंगळवेढा तालुक्यातील हुलडांती येथे मोठी यात्रा असल्याने भाविकांची गैरसोय झाली. परंतु, खासगी वाहतूक मात्र जोरात होती. पंढरपुरातही विठ्ठल दर्शनास येणाऱ्या भाविकात मोठी घट झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा