अवघ्या पाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा एसटीच्या भाडय़ात वाढ झाली असून शुक्रवारी रात्री बारापासून ती लागू होत आहे. या दरवाढीमुळे नाशिकहून धुळे व जळगावला सर्वसाधारण अथवा निमआराम बसच्या प्रवासाला लागणाऱ्या भाडय़ात पाच ते दहा रूपयांनी वाढ झाली आहे. निमआराम बसने नाशिकहून जळगावला जाण्यासाठी आता ३४४ तर धुळ्याला जाण्यासाठी २१६ रूपये मोजावे लागतील.
डिझेलचे वाढलेले दर, सुट्टे भाग व इतर बाबींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्व प्रकारच्या सेवांमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक कैलास देशमुख यांनी दिली.
लांब पल्ल्याच्या सर्वसाधारण जलद, निमआराम व रातराणी तर ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या जनता, साधी (मिनी व मिडी), जलद, रात्रसेवा, निमआराम, वातानुकूलीत निमआराम आणि वातानुकूलीत शिवनेरी यांच्या दरातही प्रति टप्प्यानुसार भाडेवाढ करण्यात आली आहे.
भाडेवाढीत ५ ते १२ वर्षांच्या मुलांना ग्रामीण बसेसमध्ये अर्धे प्रवासभाडे आधीप्रमाणेच राहणार आहे. ग्रामीण मार्गावर उप टप्प्यांची सवलत पाच टप्प्यांपर्यंत म्हणजे २० किलोमीटरपूर्वी प्रमाणेच सुरू ठेवण्यात आले आहे.
वार्षिक सवलत कार्डावर १० टक्के सवलत आधीप्रमाणे राहील. तसेच विद्यार्थी, अपंग, स्वातंत्र्यसैनिक, विशिष्ट रुग्ण यांच्यासाठी असणारी आधीची सवलत कायम राहणार आहे. प्रवास भाडे आकारणी करताना एकूण रक्कम पूर्ण न झाल्यास त्या रकमेची आकारणी न करता पूर्ण रूपयाच्या रकमेइतकीच आकारणी केली जाणार आहे. म्हणजे ५० पैशापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती पुढील पूर्ण रूपयात भाडे आकारणी केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा