आपला संचित तोटा कमी करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने आता प्रवाशांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धाडसी उपाय योजला आहे. आतापर्यंत विपणनाच्या क्षेत्रात मार खाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता विपणन विभाग (मार्केटिंग) स्थापन केला आहे. या विभागाची जबाबदारी सध्या नियोजन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सोपवली आहे. मात्र एसटीच्या विपणनाची गाडी निघाली असली, तरी त्यासाठी रस्ताच तयार नसल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाने गेल्या वर्षभरात अनेक नवनवीन मार्ग सुरू केले. यापैकी बहुतांश मार्गावर व्होल्वो गाडय़ा चालवण्यात आल्या होत्या. मात्र या मार्गाना प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे यापैकी अनेक मार्ग बंदही करावे लागले. नुकतेच बोरिवली-बीकेसी या मार्गावरील सेवाही बंद करण्यात आली. एसटीच्या सेवा उत्तम आणि वक्तशीर असूनही त्या प्रवाशांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळत नाही, असे एसटीतील एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले. परिणामी काही दिवसांपूर्वी एसटीमध्ये विपणन विभाग सुरू करण्यात आला आहे.
या विभागाची जबाबदारी नियोजन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विनोद रत्नपारखी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र एसटीतील काही अधिकाऱ्यांच्या मते विपणन म्हणजे काय, याचाच पत्ता अद्याप एसटीला नाही. त्यामुळे विपणन करायचे, म्हणजे काय करायचे याचा कोणताही ठोस आराखडा आणि नियोजन एसटीकडे नसल्याचे एसटीतील अधिकारीच सांगतात. बोरिवली-बीकेसी सेवेचा बळीही एसटीतील कर्मचाऱ्यांच्या अनास्थेनेच घेतल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आपल्याकडे असलेल्या गोष्टीचे विपणन कसे करायचे, याचे पूर्वज्ञान असणे आवश्यक असते. मात्र आमच्याकडील काही अधिकाऱ्यांची तशी इच्छाच नसते, असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, याबाबत या विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विनोद रत्नपारखी यांना विचारले असता, विपणनासाठीच्या योजना तयार नसल्या, तरी त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र याबाबत त्यांनी जास्त काही सांगण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा