तोटय़ाच्या भाराने आधीच वाकलेल्या एसटीला रातराणी सेवेचे भाडे कमी केल्याने वार्षिक सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक फटका बसणार आहे. प्रवाशांची फारशी मागणी नसताना निवडणूक वर्षांत लोकप्रिय निर्णय घेण्यासाठी महामंडळावर आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे. मात्र एसटीचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी त्याचा इन्कार केला असून खासगी बसवाहतूकदारांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हा निर्णय सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर घेतला असल्याचे सांगितले. यामुळे रातराणीचे प्रवासी आणि उत्पन्न न वाढल्यास तो मागे घेतला जाईल, असे ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
डिझेलचे वाढणारे दर, वेतनकरारामुळे वाढलेला पगाराचा बोजा यामुळे एसटीचा तोटा वाढत चालला आहे आणि प्रवासी व उत्पन्नात मात्र त्या तुलनेत फारशी वाढ नाही. पण तरीही रातराणी गाडय़ांचे भाडे मंगळवारपासून १५ टक्के कमी करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. सध्या एसटी रातराणी सेवेच्या सुमारे ७०० हून अधिक फेऱ्या दररोज होतात. त्यातून वार्षिक सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. रातराणी गाडय़ांमध्ये सरासरी २५ टक्केच प्रवासी असतात. फक्त एप्रिल-मे उन्हाळी सुट्टी, दिवाळी, नाताळ सुट्टी अशा काही हंगामाच्या काळात म्हणजे वर्षांतील फक्त ७०-७५ दिवस रातराणी गाडय़ा ‘हाऊसफुल्ल’ असतात. रातराणीचे दर कमी करावेत, अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनांकडून नसताना तोटय़ात असलेल्या एसटीवर आणखी आर्थिक भार लादला गेला आहे.
मात्र खासगी स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि एसटीचे प्रवासी वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष गोरे यांनी स्पष्ट केले. खासगी गाडय़ांमध्ये प्रवासी अधिक असतात आणि हंगामातही त्यांचा धंदा जोरात असतो. एसटीच्या तुलनेत त्यांचे दर कमी असतात, असे वाहतूक विभागाच्या अभ्यास समितीने आणि प्रवासी संघटनांनी महामंडळाच्या निदर्शनास आणले होते. त्यामुळे निवडणूक वर्ष म्हणून नाही, तर प्रवासी संख्या वाढीसाठी दरकपात करण्यात आल्याचे गोरे यांनी नमूद केले.
एसटीचा तोटा
मार्च २०१३    सुमारे ५००-६०० कोटी रुपये
एप्रिल २०१३     जानेवारी २०१४ पर्यंतचा
    तोटा-सुमारे ८०० कोटी रुपये

Story img Loader