ग्रामीण भागातील जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस.टी. खराब रस्त्यांमुळे मेताकुटीस आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ा खड्डय़ांमधून धावत आहेत. मात्र, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्य़ातील १३ तालुक्यांतील रस्ते मोठय़ा प्रमाणात उखडले गेले तर काही रस्ते वाहून गेल्याने १०० गावांतील गाडय़ा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९८ टक्के रस्त्यांवरील बसेस पूर्ववत करण्यात आल्या असल्या तरी त्या नाईलाजाने धावत आहेत. कुही तालुक्यातील धानला ते सिर्सी हा १८ किलोमीटरचा रस्ता फारच खराब असून मध्ये असलेल्या खोकरला गावाच्यापुढे गाडय़ा जात नाहीत. तसेच कुही ते अडम हा सुमारे साडेसात किलोमीटरचा रस्ता पूर्णत: बंद आहे. कान्व्हा ते खापरी या हुडकेश्वर मार्गाने जाणाऱ्या बससाठी २५ किलोमीटर अंतर कापायला दोन तास लागतात, यावरूच रस्त्यांच्या दुरावस्थेची प्रचिती येते.  
खराब रस्त्यांमुळे  बसेस बंद पडून प्रवाशांची फार गैरसोय होते. त्यातल्या त्यात विद्यार्थी, रुग्ण, शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी येणारे नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ग्रामीण भागातील शाळेत नोकरीसाठी असलेले शिक्षक, कर्मचारी शहरात राहत असल्याने त्यांची गैरसोय होते. उत्तम शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांना प्राधान्य देतात. शहराच्या सीमेवर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना महामंडळाच्या बसेसशिवाय पर्याय नाही. बसशिवाय नागपूर शहराचा संबंध तुटत असल्याने काही ठिकाणी गावांनीच पुढाकार घेऊन दगड, गिट्टी, मुरुम टाकून रस्ते गाडी जाण्याजोगे केले आहेत. मात्र, त्याचा दीर्घकाळ उपयोग होणार नाही.
रस्ते बसेस चालवण्यायोग्य नसतील तर महामंडळाच्या इंधन खर्चात आणि बसेसच्या देखभाल, दुरुस्ती खर्चात वाढ तर होतेच शिवाय सुटे भाग व टायरवरील खर्चातही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळ संबंधित विभागाला विनंती पत्र पाठवण्याशिवाय काही करू शकत नाही. राज्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेला ऑक्टोबरच्या शेवटी रस्त्याची दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, असे पत्र पाठवून १०० खराब रस्त्यांची यादीही पाठवली होती. मात्र, रस्ते दुरुस्त झाले नाहीत. मात्र, एकदा सुरू करण्यात आलेली गाडी बंद करणे महामंडळाला शक्य नसल्याने ग्रामीण भागातील जनतेसाठी एस.टी. महामंडळाने गाडय़ा सुरू केल्या असल्या तरी त्याच्या फेऱ्यांची संख्या कमी केली आहे.
ज्या ठिकाणी चारदा बसेस धावायच्या त्याठिकाणी दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वाचाच वेळ नाहक खर्च होत असल्याचे ग्रामीण भागातील सार्वत्रिक दृश्य आहे. खराब रस्ते, विद्यार्थी व प्रवाशांची होणारी वाताहत याविषयी नागपूर विभाग नियंत्रक राजीव घाटोळे यांनी चिंता आणि हतबलता व्यक्त केली आहे. खराब रस्त्यांची यादी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली
आहे. मात्र, अद्यापपर्यंत रस्ते दुरुस्ती झाली नाही. खराब रस्त्यांवर गाडय़ा बंद ठेवण्याचा निर्णयही मध्यंतरी आम्ही घेतला होता मात्र, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी महामंडळाला नुकसान सोसून बसेस सुरू ठेवाव्या लागतात.

Story img Loader