सातारा येथे ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छेडलेले आक्रमक आंदोलन.. शासनाशी अनुकूल चर्चा न झाल्यामुळे या संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले.. त्याची परिणती झाली राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस लक्ष्य होण्यात.. कधी दगडफेक तर कधी आग लावण्याचे प्रकार.. आंदोलनाचा भडका उडाला असताना त्याची पर्वा न करता आगार व्यवस्थापक म्हणून सहकाऱ्यांसमवेत पेटलेल्या बसेस विझविणे आणि स्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी त्वरेने नियोजन करण्याचे दुहेरी आव्हान पेलले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या यामिनी जोशी यांनी हाताळलेली उपरोक्त परिस्थिती त्यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष देण्यास पुरेशी ठरावी.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात विभाग नियंत्रक म्हणून यामिनी जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राज्यात प्रथमच महिला विभाग नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली असून तो बहुमान जोशी यांना त्यांच्या आजवरच्या कामगिरीमुळे मिळाला आहे. मूळच्या सातारा येथील असणाऱ्या जोशी यांनी बी.एस्सी (स्टॅटिक्टीक्स), एमबीए इन फायनान्स आणि बी.एड् (गणित व विज्ञान) असे वेगवेगळ्या विषयात शिक्षण पूर्ण केले. शिक्षकी पेशाच्या चाकोरीबध्द कामकाजापेक्षा त्यांचा व्यवस्थापनात रस होता. राज्य परिवहन महामंडळाने २००८ मध्ये रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली. त्यात आगार व्यवस्थापक पदासाठीच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. सातारा जिल्ह्यातील इचलकरंजी येथे जानेवारी २००९ मध्ये त्यांची वरिष्ठ आगार व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली. आयुष्यातील या ‘वळणावर’ त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. सासर व माहेर या ठिकाणाहून भरभक्कम पाठिंबा मिळाल्याने पती व मुलीसमवेत त्यांनी हा प्रवास सुरू केला. आजवर राज्य परिवहनशी प्रवासापुरता राहिलेला संबंध आगार व्यवस्थपाकपदी झालेल्या नेमणुकीने दृढ झाला. पुढील चार वर्ष कोल्हापूर व सातारा अशी त्यांची फिरस्ती राहिली.
या काळात आगार व्यवस्थापक म्हणून त्यांच्यासमोर विविध आव्हाने समोर ठाकली. त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल ते म्हणजे पुरूष सहकाऱ्यांशी जुळवून घेणे. सरकारी, शासकीय वा कुठेही महिला सहकारी म्हणजे आपल्या ‘स्त्री’ असण्याचे भांडवल करतात, कुठल्याही घरगुती अडचणी पुढे करून कामातून पळ काढायचा किंवा चुकलेल्या कामाबद्दल रडून कधी वैतागुन सारवासारव करायची असा विचार केला जातो. या विचारसरणीला त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले. कोणत्याही अडचणी पुढे करण्याऐवजी प्रश्नाला थेड भिडायचे ही त्यांची शैली. यामुळेच पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेचे नियोजन त्यांना व्यवस्थितपणे करता आले. सर्वात महत्वाचे म्हणजे, गणेशोत्सवात मीरज येथे दंगल उसळल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. सर्वत्र जाळपोळ, हिंसाचार अशा परिस्थितीत विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून काम करताना आगार आठ दिवस बंद राहिले. कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात सुरक्षितेचे वातावरण निर्माण करून बस सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
नाशिक विभागात काम करताना मंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे तसेच जनमानसात मंडळाची प्रतिमा सुधारणे यासाठी
विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. मंडळाचे विपणन उत्तम पध्दतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
सध्या सुरू असलेली वातानुकूलीत बससेवेची व्यवस्था सुधारणे, नाशिक-पुणे मार्गावर जादा बस सोडण्याचे नियोजन यावर त्यांचे लक्ष आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक विभागाचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचे नियोजन प्रगतीपथावर आहे. महिला कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने विशाखा समिती कार्यान्वित असली तरी महिला वा पुरूष सहकाऱ्यांचे प्रबोधन गरजेचे असल्याचे त्यांना वाटते. समज देऊनही कृतीत वा वृत्तीत बदल होत नसेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांचे ठाम म्हणणे. महिला कर्मचाऱ्यांनी आपण ‘स्त्री’ असण्याचा गैरफायदा घेऊ नये असे त्यांना वाटते. नवख्या तरूणाईला या क्षेत्रात यायचे असेल तर करिअरच्यादृष्टीने अनंत संधी आहेत. कुठल्याही अडचणींचे रडगाणे गाण्याऐवजी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली तर, प्रवासातील अडथळे सहज दुर करून ध्येय प्राप्त करता येऊ शकते, हा त्यांचा सल्ला बरेच काही सांगणारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा