ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी स्थगित केल्यामुळे सोलापूर जिल्हय़ातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दिवसभरात कोठेही अनुचित प्रकार न घडल्यामुळे एसटी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.
जिल्हय़ात विशेषत: पंढरपूर, माढा, माळशिरस व करमाळा आदी तालुक्यांमध्ये शेतकरी आंदोलनामुळे एसटी बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांत दगडफेक करून पाच एसटी बसेस फोडण्यात आल्या होत्या. तर पंढरपूरजवळ एक एसटी बस जाळण्यात आली होती. त्यामुळे एसटी वाहतूक संवेदनशील भागातून होत नव्हती. मात्र शुक्रवारी आंदोलन स्थगित झाल्यामुळे एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सायंकाळपर्यंत एसटी वाहतुकीला कोठेही अडथळा आला नसल्याचे सोलापूर आगाराच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करून संताप व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा
प्रयत्न केला. माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पुतळय़ाचे दहन केले. त्या वेळी त्या आंदोलनात स्थानिक राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते, असे कळते. यात पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
पालकमंत्र्यांची पंचाईत
सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी, नेपतगाव, चळे आदी गावांना भेटी देण्यासाठी गेले असताना रांझणी येथे ऊस आंदोलकांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला. यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यामुळे निरुत्तर होऊन पालकमंत्री प्रा. ढोबळे हे आपली मोटार तेथेच सोडून राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या दुचाकी मोटारसायकलवर बसून
निघून गेले.    

Story img Loader