उरणमध्ये रोजगार तसेच व्यवसायानिमित्ताने कोकणातून आलेले अनेकजण वास्तव्य करीत असून या कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी थेट उरणमधून बस नव्हती, त्यामुळे उरणमधील कोकण विभागीय प्रवासी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार उरण आगारातून दररोज सकाळी ७ वाजता उरण ते रत्नागिरी दरम्यानची एसटी बस सुरू करण्यात आली आहे. तळकोकणातील हजारो चाकरमानी उरण परिसरात वास्तव्य करीत आहेत.अनेकजण विविध सणांसाठी गावी जातात. मात्र त्यांना गावी जाण्यासाठी थेट उरण येथून बस नव्हती. मागील वर्षी उरण ते गणपतीपुळे दरम्यान एक एसटी बस सुरू करण्यात आलेली होती. या बसला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ती बस बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना पनवेल येथे जाऊन बस पकडावी लागत होती. याची दखल घेऊन कोकण विभागीय प्रवासी संघटनेने उरणच्या आगार प्रमुखांकडे कोकणातील प्रवाशांसाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आगार प्रमुखांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उरण ते रत्नागिरी दरम्यानची बससेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे संतोष पवार यांनी दिली आहे. या सेवेमुळे उरणमधील कोकणवासीयांकडून आनंद व्यक्त होत आहे.

Story img Loader