डिझेलच्या वाढत्या दरामुळे दिवसागणिक वाढणारा खर्च लक्षात घेऊन इंधनाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाची कसरत सुरू असून त्याअंतर्गत बस चालविताना ‘अ‍ॅक्सिलेटर’चा कसा वापर करावा, याचे खास ‘सिम्युलेटर’द्वारे तब्बल अडीच हजार चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नऊ आगारांमध्ये काही अंशी दिसत असला तरी नाशिक शहरासह नाशिक-पुणे महामार्ग आणि नाशिक-सिन्नर या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे डिझेलचा अपव्यय रोखणे अवघड झाले आहे. तर दुर्गम आदिवासी भागातील निकृष्ट रस्ते डिझेलचा नियोजनपूर्वक वापर करण्यास अडथळा ठरल्याने त्याचा फटका पेठ आगाराला बसला आहे. इंधन वाचविण्यासाठी ज्येष्ठ चालक जितका प्रयत्न करतात, तितका नव्याने भरती झालेल्या चालकांकडून होत नसल्याचे दिसते.
सातत्याने होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या खर्चाचा आलेख उंचावत आहे. ही बाब महामंडळाचा तोटा वाढविण्यास कारक ठरते. डिझेलचा योग्य वापर व्हावा, यासाठी डिझेलचा प्रत्येक थेंब मोलाचा असतो हे चालकांच्या मनावर बिंबविण्यासाठी महामंडळ वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून चालकांनी बसच्या ‘अ‍ॅक्सिलेटर’चा विनाकारण वापर करू नये आणि वेग नियंत्रणात ठेवल्यास डिझेलची कशी बचत होईल हे लक्षात आणून देण्यासाठी खास सिम्युलेटर आणण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक आगारावर ही यंत्रणा नेऊन चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. सहा महिन्यांत २५०० चालकांना प्रशिक्षण देण्याची
प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
सर्व आगारांतील चालकांना प्रशिक्षण दिल्यामुळे बस चालविताना प्रत्येकाकडून त्या अनुषंगाने प्रयत्न होणे अपेक्षित होते. परंतु, त्यात वेगवेगळे गतिरोधक असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाची १३ आगारे असून त्यात तब्बल १००० बसेस प्रवासी वाहतुकीची जबाबदारी सांभाळतात. २५०० चालकांमार्फत ही धुरा सांभाळली जाते.
एसटी महामंडळाच्या निकषानुसार प्रत्येक बसने प्रति दहा लिटरला ४६.७० किलोमीटर मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. किलोमीटरचा हा निकष पाळला न गेल्यास डिझेलचा अपव्यय मानला जातो. म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक असे हे गणित आहे. ‘सिम्युलेटर’च्या प्रशिक्षणाद्वारे चालकांना बस कशी चालविल्यास किती डिझेल बचत होईल हे समजावून दिले गेले. परंतु, काही विशिष्ट ठिकाणी चालकांची इच्छा असूनही डिझेल बचत करणे अवघड झाले आहे. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेससमोर वाहतूक कोंडीचे आव्हान आहे. पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, द्वारका, शालिमार, मध्यवर्ती भागातून मार्गक्रमण करताना बसेसला किती तरी मिनिटे एकाच ठिकाणी थांबून राहावे लागते. या वेळी बस बंदही करता येत नाही. यामुळे डिझेलचा नियोजनपूर्वक वापर करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तशीच स्थिती नाशिक-पुणे आणि नाशिक-सिन्नर रस्त्यावर आहे. परिणामी, नाशिक शहर, सिन्नर आगारांमध्ये हे प्रशिक्षण देऊनही फारसा उपयोग झाला नाही. दुर्गम आदिवासी भागात निकृष्ट रस्त्यांमुळे डिझेल बचत करणे अवघड बनले आहे. यामुळे पेठ आगारात हा उपक्रम यशस्वी ठरू शकला नाही.
भंगार साहित्यातून सिम्युलेटरची निर्मिती
एसटी महामंडळाच्या बुलढाणा व नागपूर कार्यशाळेने भंगार सामानातून चालकांना उपयुक्त ठरतील, अशा सिम्युलेटरची निर्मिती केली. अवघ्या पाच ते सहा हजार रुपयांत निर्मिलेल्या सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिल्यास आठ तासांच्या कामगिरीत बस योग्य वेगात ठेवून अ‍ॅक्सिलेटरचा योग्य वापर केल्यास सुमारे पाच लिटर डिझेलची बचत होऊ शकते, असे निदर्शनास आले. या पाश्र्वभूमीवर, राज्यातील २४८ आगारांत सिम्युलेटर केंद्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत नाशिक विभागात ही यंत्रणा कार्यान्वित झाली. बस चालविण्यासाठी डिझेलचा कसा वापर होतो, हे या यंत्राद्वारे समजावून दिले जाते. बसचा वेग हळूहळू वाढविल्यानंतर डिझेलच्या वापराचे प्रमाण यंत्रात स्पष्टपणे दिसते. त्यामुळे ठरावीक वेगात बस चालविल्यास अथवा वेगाचे प्रमाण कमी-जास्त करण्याचे टाळल्यास म्हणजेच अ‍ॅक्सिलेटरचा निष्कारण वापर टाळल्यास डिझेलमध्ये मोठी बचत होत असल्याचे या यंत्राद्वारे समजावून देण्यात आले.
नवीन चालकांचे दुर्लक्ष
डिझेलची बचत करण्यासाठी एसटीचे ज्येष्ठ चालक जितका प्रयत्न करतात, तितका प्रयत्न नवोदित चालकांकडून होत नसल्याचे महामंडळाचे निरीक्षण आहे. मागील वर्षी नाशिक विभागात नव्या चालकांची मोठय़ा प्रमाणात भरती करण्यात आली होती. या चालकांमार्फत त्या अनुषंगाने फारसे प्रयत्न केले जात नाहीत, ही नाशिक विभागाची डोकेदुखी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus simulator path for save fuel
Show comments