खालावत चाललेल्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाने आता अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याचेच पहिले पाऊल म्हणून आता एसटी प्रशासनाने आगारात मुक्कामाला आलेली प्रत्येक बसगाडी धुऊनच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. धुलाईसाठी एसटीने जेट मशिन्सही घेतली असून मुंबईच्या मध्यवर्ती आगारातून दर दिवशी ४०५ गाडय़ा धुऊन मार्गावर रवाना होत आहेत.
‘लाल डबा’ म्हणजे बाहेरून पानाच्या पिंका पडलेली, काळे डाग लागलेली बस, ही परिचित प्रतिमा आहे. तसेच अनेकदा आगारात मुक्कामाला असलेली गाडी सकाळी रवाना होण्यास निघाल्यानंतर ती आतून स्वच्छ नसल्याचे लक्षात येते. परिणामी प्रवासी ‘वाट पाहीन, पण एसटीशिवाय जाईन’ असे म्हणून एसटीकडे पाठ फिरवत आहेत. एसटीच्या जुन्या नियमांप्रमाणे एखाद्या आगारातील गाडी दुसऱ्या आगारात मुक्कामाला गेल्यास ती धुतली जात नाही. ज्या आगाराची गाडी, त्याच आगारात ती धुतली जावी, असे या नियमावलीत म्हटले होते.
मात्र प्रवाशांचा विचार करून एसटीचे माजी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोणत्याही आगारात कोणत्याही आगारातील गाडी मुक्कामाला आली, तर ती सकाळी निघताना चकचकीत होऊनच बाहेर पडली पाहिजे, असे ठरवण्यात आले आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी एसटीने प्रत्येक आगारात जेट मशिन्स बसवून घेतली आहेत. त्यांच्या साहाय्याने प्रत्येक गाडी १५ मिनिटांत आतून बाहेरून धुणे शक्य होते. सध्या मुंबई आगारात दिवसभरात ४०५ गाडय़ांची ये-जा होते. त्यापैकी ३०० गाडय़ा बाहेरच्या आगारांतील असतात.
नव्या नियमाप्रमाणे चार तासांच्या वर आगारात थांबणाऱ्या गाडीची साफसफाई करूनच ही गाडी रस्त्यावर उतरवली जाते. प्रवाशांना उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने एसटीने अनेक काटेकोर पावले उचलली आहेत. गाडय़ांची स्वच्छता हे यापैकीच एक पाऊल आहे. आमच्या या उपक्रमामुळे स्वच्छतेच्या कारणामुळे एसटीकडे पाठ फिरवणारे प्रवासी पुन्हा एकदा आकर्षित होतील, असा विश्वास एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा