लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मतदानापर्यंत थंडावली असताना विविध शासकीय आस्थापना आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात गर्क झाल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने सिंहस्थ काळात शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना वाहन तळावरून नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ने-आण करण्यासाठी आवश्यक बसेसची तजवीज करण्याची तयारी चालविली आहे. सिंहस्थ काळासाठी परिवहन महामंडळाने ५०० जादा नवीन बसेसची मागणी केली असली तरी एकूण एक हजार ३४५ जादा बसेस या कामासाठी लागणार आहेत. नव्या बसेससाठी निधीची प्रतीक्षा असून आवश्यकतेनुसार बसेसची उपलब्धता न झाल्यास इतर जिल्ह्यांमधून त्या मागविणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पर्वणीच्या दिवशी शाही स्नानासाठी देशभरातील व परदेशातून लाखो भाविक येत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, वाहतूक व्यवस्था कोलमडू नये हे प्रशासनासमोर आव्हान आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहन महामंडळाने शहर परिसरात व बाहेरील बाजूस १९ ठिकाणी वाहनतळांची निश्चिती केली आहे. शहरात दाखल होणारी सर्व खासगी वाहने या ठिकाणी थांबविली जातील. या वाहनतळापासून भाविकांना नाशिक व त्र्यंबक परिसरात ने-आण करण्यासाठी
बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. त्याकरिता ५२५ जादा बसेसची मागणी करण्यात आली आहे.
जवळपास सर्वच प्रस्तावित वाहनतळ शहराबाहेर आहेत. वाहनतळनिहाय किती प्रवाशांची वाहतूक करावी लागेल या दृष्टीने बसेसचे नियोजन केले जाईल. मोहदरी वाहनतळापासून नाशिकरोड बसस्थानकापर्यंत १५० बसेस, ओढा वाहनतळ ते निलगिरी बागेपर्यंत १५०, ओढा रेल्वे स्थानक ते निलगिरी बाग ५०, आडगांव ट्रक टर्मिनल ते निलगिरी बाग १००, आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते निलगिरी बाग ५०, हॉटेल राऊचे पुढील कमानीजवळील जागा ते निलगिरी बाग ५०, दुगांव ते सोमेश्वर ७५, सातपूर-अंबड लिंक रोड येथील राज्य परिवहन महामंडळाची जागा ते महामार्ग बसस्थानक १००, विल्होळी वाहनतळ ते महामार्ग बसस्थान १५०, खंबाळे वाहनतळ ते तुपादेवी येथील माउली धामची जागा ३००, पहिने ते तुपादेवी २५, अंबोली ते सापगांव ७५, श्रीसप्तशृंगी गड ५०, श्री क्षेत्र कावनई, टाकेद २० बसेसची गरज भासणार आहे. म्हणजे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी या काळात एकूण १३४५ बसेसची गरज लागणार असल्याचे गृहीतक महामंडळाने मांडले आहे.
या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला असला तरी आचारसंहिता व अन्य काही कारणांनी आवश्यक निधी पदरात न पडल्याने महामंडळाने पदरमोड करीत कामांना सुरुवात केली आहे. नव्या बसेस उपलब्ध न झाल्यास राज्य तसेच जिल्ह्यातील इतर आगारांकडून आवश्यक वाहनसंख्या पूर्ण केली जाणार आहे. त्या दृष्टीने सध्या नियोजन केले जात आहे.
सिंहस्थासाठी एसटीची कसरत!
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मतदानापर्यंत थंडावली असताना विविध शासकीय आस्थापना आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात गर्क झाल्या आहेत.

First published on: 07-05-2014 at 08:46 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St department arrange buses for kumbh mela