० विनाविलंब करार पूर्ण करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आश्वासन
० मान्यताप्राप्त तसेच अमान्यताप्राप्त कामगार संघटनांमध्ये संघर्ष
एसटी महामंडळातील सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा वेतन करार आता शेवटच्या टप्प्यात आला असून येत्या महिन्याभरात कर्मचाऱ्यांना १३ टक्के वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी मान्यता नसलेल्या नऊ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सोमवारी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची भेट घेतली. यानंतर कपूर यांनी मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी, यासाठी एसटीची मान्यताप्राप्त कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पाठपुरावा केला. ही वेतनवाढ किती असावी, यातही या संघटनांमध्ये मतभेद होते. अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी समन्वय साधत १३ टक्क्यांवर वेतनवाढ निश्चित केली.
या घटनेला दोन महिने उलटून गेले, तरीही अद्याप या कराराला मान्यता मिळालेली नाही. या पाश्र्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दीपक कपूर यांची भेट घेतली. या भेटीत कपूर यांनी १ जुलैपासून नवा वेतन करार लागू करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे आश्वासन दिल्याची माहिती श्रीरंग बरगे यांनी दिली. मात्र याबाबत दीपक कपूर यांना विचारले असता, कृती समितीचे सर्व म्हणणे आम्ही ऐकून घेतले आहे. करार करताना कोणताही अनावश्यक उशीर होणार नाही, एवढेच आश्वासन आपण त्यांना दिले आहे, असे त्यांनी सांगितले. करार करताना उत्पादकता वाढीबद्दलचे मुद्देही लक्षात घ्यायला हवेत, असेही ते म्हणाले.
येत्या बुधवारी कराराचा अंतिम मसुदा प्रशासन आमच्यासमोर सादर करणार असून त्याचा अभ्यास करून हा मसुदा आम्हाला मान्य आहे की नाही, हा निर्णय आम्ही कळवू, असे एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.