विटा एस.टी. आगारातील महिला वाहकाला तान्ह्या मुलीसह डय़ुटी करायला भाग पाडल्याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विभाग नियंत्रकांनी सोमवारी मनसे परिवहन सेनेच्या आंदोलकांना दिले. संघटनेची वर्गणी दिली नाही म्हणून तिच्यावर आणि तिच्या पतीवर हा अन्याय असल्याची तक्रार तिने केली आहे.
 सांगली जिल्ह्यातील विटा आगारातील महिला वाहक प्राजक्ता तोडकर हिला शनिवारी डय़ुटीमध्ये सवलत दिली नाही म्हणून बाळाला घेऊन विटा-सांगली अशी वाहकाची डय़ुटी बजावावी लागली. या अन्यायी प्रकाराने त्रस्त झालेल्या तोडकर यांनी सदरची बाब माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच एका संघटनेची वर्गणी दिली नाही म्हणून माझ्यावर आणि पतीवर हा अन्याय असल्याची खंत बोलून दाखविली होती.
 मनसे परिवहन सेनेचे विभागीय अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी विटा येथे जाऊन महिला वाहक श्रीमती प्राजक्ता तोडकर आणि तिच्या पतीची विचारपूस केली आणि वाहनातून त्यांना सांगलीत आणले. या वेळी सावंत यांनी एसटीचे प्रभारी विभाग नियंत्रक एस. डी. कणेगावकर यांची भेट घेऊन या महिला वाहकावरील अन्यायाचा पाढा वाचला. या वेळी प्राजक्ता तोडकर हिने आपल्याला विटा आगाराकडून कसा त्रास दिला जातो याची माहिती विभाग नियंत्रकासमोर मांडली. या वेळी मनसे परिवहन सेनेचे विभागीय अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी याबाबत काय कारवाई करणार याचा खुलासा करण्याची मागणी केली. या महिला वाहकावर अन्याय करणाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही, तर मनसे स्टाइलने धडा शिकवला जाईल असा इशाराही मनसेचे नेते तानाजीराव सावंत यांनी या वेळी दिला. त्यांच्यासमवेत मनसेचे स्थानिक प्रमुख शेरखान मुजावर आणि सहकारी उपस्थित होते.