शिक्षण मंडळ प्रशासनाधिकाऱ्यांचा आदेश
सेंट फ्रान्सिस शाळेने ३५ टक्क्यांनी वाढविलेल्या शुल्कवाढीला शिक्षण मंडळाची परवानगी घेतली नाहीच, पण तसा प्रस्तावही दिलेला नाही. यामुळे ही शुल्कवाढ पूर्णत: बेकायदेशीर असून शाळेने ती त्वरित बंद करावी, असा लेखी आदेश मनपा शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी दिले आहेत.
सेंट फ्रान्सिस शाळेने केलेल्या शुल्कवाढी विरोधात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली तिडके कॉलनी व राणेनगर शाळेतील शेकडो पालकांनी शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाधिकारी कुंवर यांना निवेदन दिले. पालकांच्या तक्रारीची सखोल चौकशी करून त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन कुंवर यांनी दिले. या संदर्भात पुढील दोन दिवसात शाळेला भेट देऊन शुल्क वाढीसंदर्भात कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. शाळेत पालक शिक्षक संघाच्या सभा घेतल्या जात नाहीत. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य असलेल्या विशाखा समितीचे गठनही केलेले नाही. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता घेतलेली नाही. आदी बाबींकडे पालकांनी लक्ष वेधले. या सर्वाची चौकशी करण्याचे आश्वासन कुंवर यांनी दिले.
शाळेने केलेली शुल्कवाढ पालकांच्या एकजुटीमुळे रद्द झाली आहे. या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी बुधवारी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक येथे आयोजित बैठकीस पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंचतर्फे छाया देव, डॉ. मिलिन्द वाघ, वासंती दीक्षित आदींनी केले आहे.