राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने नव्या वर्षांत कात टाकून शहरी भागांतील प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाशी जोडलेले राहण्यासाठी एसटीने आता ‘ई-गव्र्हनन्स’च्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षांत एसटीची आस्थापने गुगल मॅपवर दिसण्याबरोबरच प्रवाशांना एसटीची परिपूर्ण माहिती देणारी मोबाइल अॅप्स वगैरेही सुरू होणार आहेत.
एसटीच्या ‘सौजन्य अभिवादन’ या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील आगारात महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक विकास खारगे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी खारगे यांनी एसटीच्या ई-गव्र्हनन्सचा आराखडा मांडला. एसटीला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वरचढ ठरवण्याचा आपला प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. ‘पेपरलेस’ कारभाराच्या दृष्टीनेही एसटीचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्षांत एसटीच्या राज्यभरातील कार्यालयांत जास्तीत जास्त कारभार संगणकांद्वारे केला जाईल. सध्या एसटीच्या विविध विभागांतील प्रमुखांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होते. यापुढेही ही बैठक चालूच राहणार असल्याचे खारगे यांनी सांगितले. प्रवाशांच्या दृष्टीने एसटी येणाऱ्या वर्षांत काही मोबाइल अॅप्लिकेशन्स विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. या अॅप्सवर प्रवाशांना एसटीची सर्व माहिती उपलब्ध असेल. यात एसटीच्या वेळा, विविध आगारांतील वेळापत्रक, अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आदींचा समावेश असेल.
तसेच एसटीच्या सर्व १८ हजार गाडय़ांना जीपीएस आणि जीपीआरएस प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहितीही खारगे यांनी दिली. सध्या शिवनेरी आणि २०० हिरकणी गाडय़ांमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली असून येत्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व गाडय़ांना ही प्रणाली बसवण्यात येईल. त्यामुळे गाडय़ा कोणत्या वेळी कुठे आहेत, पुढील आगारात कधी पोहोचतील, याची माहिती उपलब्ध होऊ शकेल. तसेच एसटीची सर्व आस्थापने आता गुगल मॅपवर दिसणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा