प्रवाशांच्या सूचना व तक्रारी यांचे विभागीय विश्लेषण
चार महिन्यांपूर्वी ‘फेसबुक’वरचा आपला प्रवास सुरू करणाऱ्या एसटी महामंडळाने आता आपला जनसंपर्क या माध्यमाद्वारे अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने एक निर्णय घेतला आहे. एसटीच्या ३० विभागांतील एक-एक अधिकारी आता एसटीच्या फेसबुक पेजवर दर दिवशी नजर ठेवणार आहे. या पेजवर प्रवाशांनी केलेल्या सूचना किंवा तक्रारी याची दखल घेऊन ताबडतोब त्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटीतर्फे सांगण्यात येत आहे.
एसटीने २९ ऑगस्ट रोजी फेसबुकवरील आपला प्रवास सुरू केला. या दिवसापासून गेल्या चार महिन्यांत एसटीचे फेसबुक पेज ६७७२ लोकांनी ‘फॉलो’ केले आहे. गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रभरातील प्रवाशांनी एसटीला या फेसबुकच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या. तसेच प्रवाशांनी आपल्या तक्रारींनाही या पेजवरून वाचा फोडली. या तक्रारींची दखल आतापर्यंत एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील जनसंपर्क विभागाकडून थेट घेतली जात होती.
मात्र एसटीने आता प्रवाशांसह ‘व्हच्र्युअल’ संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एसटीच्या ३० विभागांत एकेका अधिकाऱ्याकडे दर दिवशी हे फेसबुक पेज बघण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पेजवर त्या त्या विभागासंबंधी काही सूचना किंवा तक्रारी असतील, तर त्याची दखल त्या त्या विभागातील अधिकाऱ्याने घ्यायची आहे. ही सूचना व्यवहार्य असेल, तर त्या वर काय कार्यवाही करता येईल, याची माहिती मध्यवर्ती कार्यालयाला पोहोचवायची आहे. तसेच तक्रारींबाबतही कारवाई करायची आहे.या माध्यमामार्फत आम्ही प्रवाशांच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रवाशांना नेमक्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, एसटीकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सर्व गोष्टी आम्हाला ताबडतोब कळतात. प्रवाशी प्रत्यक्ष भेटल्यावर उघडपणे बोलतीलच असे नाही. मात्र फेसबुकवर ते त्यांच्या तक्रारी किंवा सूचना बिनदिक्कत सांगतात. त्यामुळे आम्हीही त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आता विभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्याचे ठरवले आहे, असे एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा