जुलै महिन्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागामार्फत विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाने ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर तसेच बोरिवली येथील नॅन्सी कॉलनी येथून विशेष गाडय़ा सोडण्याचे ठरविले आहे. ४ जुलैपासून पंढरपूरच्या दिशेने जादा गाडय़ा सोडण्यात येणार असून, १० जुलै रोजी पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून परतीच्या वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व गाडय़ांचे आरक्षण एक महिना अगोदर उपलब्ध करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांचा आकडा दरवर्षी काही लाखांच्या घरात असतो. या यात्रेसाठी राज्य परविहन मंडळाने विशेष गाडय़ांची व्यवस्था करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या प्रवासी संघटनांमार्फत सातत्याने केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन यंदा राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्य़ातून विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांचे आरक्षण बुधवारपासून सुरू झाले असून, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून प्रवाशांनी आरक्षण उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.

Story img Loader