एसटीमधील मान्यताप्राप्त कामगार संघटनेने कामगारांची एक पिढी उध्वस्त केल्याचे सांगत या संघटनेने कामगारांना वेठबिगार केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे राज्य सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांनी सोमवारी पारनेर येथे केला.
मनसेच्या कामगार संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा आज अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे कार्याध्यक्ष विकास अंकलेकर, मनसचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावडे, सचिव सुरेश चौधरी, पारनेर आगाराचे सचिव राम नानेकर, अध्यक्ष बबन लटांबळे, मनसेचे जिल्हा उपप्रमुख सोपान गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. कामगारांचे अशिर्वाद असल्यानेच गेल्या साडेतीन वर्षांत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगून अभ्यंकर यावेळी बोलताना म्हणाले, दि. ११ जानेवारीला मुंबईत राज्याचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.  एसटी मधील एक लाख कामगारांच्या व त्यांच्या संसाराच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा आहे. एसटी वाचविण्यासाठी गेली बारा वर्षे कामगारांनी स्वत:च्या संसाराची राख रांगोळी करून महामंडळाचा कारभार रूळावर आणला. आमचे कर्मचारी नेटाने काम करीत आहेत. अधिकारी मात्र महामंडळ बुडवायला निघाले असुन एसटीची सेवा अत्यावश्यक असताना कर्मचारी अतिअत्यावश्यक का नाही असा सवाल त्यांनी केला.
प्रवासी करात ५० टक्के सवलत, केंद्राच्या डिझेलवरील करात सुट, विविध सवलतींचे राज्य सरकाकडून येणे असलेले १ हजार ६०० कोटी तसेच टोलटॅक्स माफ झाल्यास एसटी मोठया फायदयात येऊन कामगारांना चांगले वेतन मिळू शकते व प्रवाशांनाही सुखकारक सेवा मिळू शकते. आमची संघटना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देईल असे अभ्यंकर म्हणाले. अभ्यंकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आगारात आगमन झाल्यानंतर सचिव राम नानेकर यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. तेथून सर्व कर्मचारी मिरवणुकीने सभास्थळी गेले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा