शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे महापालिकेच्या वतीने पुण्यात यथोचित स्मारक उभारावे, असा ठराव शिवसेनेतर्फे स्थायी समितीला देण्यात आला आहे. ठाकरे यांच्या स्मारकासंबंधीचा हा ठराव शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना थोरवे यांनी दिला असून ठरावावर अनुमोदक म्हणून शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी स्वाक्षरी केली आहे. ठाकरे यांच्या निधनाने केवळ मुंबई, पुणे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे. तमाम मराठी माणसाचे दैवत असलेला हा महान नेता साहित्यिक, व्यंगचित्रकार आणि कलावंतही होता. या महान नेत्याचे जन्मस्थानही पुणे हेच आहे. बाळासाहेबांची कर्मभूमी जरी मुंबई होती, तरी पुण्याबद्दल त्यांना ओढ होती. पुण्यात त्यांचे काही काळ वास्तव्यही होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत त्यांचे यथोचित स्मारक पुणे महापालिकेने उभारावे, असे या ठरावात म्हटले आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेतही ठाकरे यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या महान नेत्याचे स्मारक पुण्यात योग्य जागी व्हावे किंवा त्यांचा पुण्यात पुतळा उभारला जावा, अशी माझी सभेला विनंती आहे, अशी भावना हरणावळ यांनी सभेत बोलताना व्यक्त केली.
थोरवे आणि हरणावळ यांनी दिलेल्या या ठरावापाठोपाठ स्मारकासंबंधीचा दुसरा एक ठराव शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य संजय भोसले यांनी स्थायी समितीला दिला आहे. कोथरूड येथे महापालिकेतर्फे भव्य शिवसृष्टी उभारली जात आहे. त्या जागी ठाकरे यांचे स्मारक करावे, असे भोसले यांनी या ठरावात म्हटले आहे.