पनवेल शहरात शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरचा तुटवडा आहे. रिक्षाचालक नवीन परमीटसाठी तालुक्यातील कचेरीला प्रतिज्ञापत्रासाठी धावाधाव करीत आहेत. मात्र तालुक्यात उद्भवलेल्या १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरच्या तुटवडय़ामुळे रिक्षाचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात १०० रुपयांच्या २२ हजार ९५० स्टॅम्पपेपरची विक्री झाली होती. पनवेल तालुक्याने ८० हजार स्टॅम्पपेपरची मागणी जिल्हा ट्रेझरी विभागाकडे केली होती; परंतु स्टॅम्पपेपरचा पुरवठा कमी असल्याने जिल्हा ट्रेझरीतून अवघे २५ हजार स्टॅम्पपेपर पनवेलकरिता देण्यात आले.
बाजारात स्टॅम्पपेपरचा तुटवडा असतानाच काही स्टॅम्पपेपर वेंडरनी आपली पोळी भाजून घेण्याचा राजरोस व्यवसाय पनवेलमध्ये सुरू केला आहे.
स्टॅम्पपेपर वेंडरांनी पेपरवर मजकूर लिहून देण्यासाठी ठिकठिकाणी झेरॉक्स सेंटर थाटले आहेत. या सेंटरमधून टंकलेखन करून प्रतिज्ञापत्र केले जाते. आमच्या कार्यालयातून प्रतिज्ञापत्र केल्यास आम्ही स्टॅम्पपेपर देऊ, असा पवित्रा पनवेलमधील काही स्टॅम्पपेपर वेंडरनी घेतला आहे. त्यामुळे रिक्षाचालकाला दीडपट रक्कम मोजून रांगेत उभे राहावे लागत आहे. तालुक्यात १५ स्टॅम्पवेंडर आहेत.
याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केल्यानंतर स्टॅम्पपेपर वेंडरच्या तक्रारींसाठी सामान्यांनी सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसील कार्यालयातून करण्यात आले आहे.

Story img Loader