सिंहस्थ कामांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ११० कोटी तर घरकुल योजनेसाठी हुडकोकडून ९० कोटी अशा एकूण २०० कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सिंहस्थ कामांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. १०.४० टक्के दराने हे कर्ज घेतले जाईल. त्यासाठी पालिकेच्या मिळकती गहाण ठेवल्या जाणार आहेत.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर अॅड. राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची ही पहिलीच बैठक होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, महापालिकेने विविध कामांसाठी १०५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. तिजोरीत खडखडाट असताना ही कामे पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे.
या पाश्र्वभूमीवर, सिंहस्थ कामे तसेच रखडलेली घरकुल योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महापालिकेने शासनाकडे कर्ज उभारणीसाठी परवानगी मागितली होती. त्यास २०१३ मध्ये राज्य शासनाने दोन्ही बाबींसाठी एकूण २०० कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस मान्यता दिली होती. त्यानंतर सिंहस्थ कामांसाठी उभारावयाच्या ११० कोटी रुपयांच्या कर्जासाठी राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यास बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेला प्रस्ताव किफायतशीर असल्याचे सांगण्यात आले. १५ वर्षे मुदतीसाठी १०.४० टक्के व्याजदराने या बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली. कर्जाच्या तारणापोटी कर्ज रकमेच्या १२५ टक्के मूल्य असलेल्या स्थावर मिळकती गहाण ठेवाव्या लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. इतर बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेचा प्रस्ताव योग्य असल्याने त्यास मान्यता देण्यात आल्याचे ढिकले यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत साकारणाऱ्या घरकुल योजनेचे कामही रखडलेले आहे. त्यासाठी हुडकोकडून ९० कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा