नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेश पवळे यांची बिनविरोध निवड झाली. या पदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या गफारखान यांचा भ्रमनिरास झाला.
स्थायी समितीत काँग्रेसचे आठ, तर शिवसेना-भाजप-एमआयएम-राष्ट्रवादी व संविधान पार्टीचे ८ सदस्य आहेत. काँग्रेसतर्फे पवळे व राष्ट्रवादीकडून गफारखान यांनी या पदासाठी उमेदवारीअर्ज दाखल केले होते. दोघांचेही अर्ज वैध ठरल्याने निवडणूक होणार काय, असे चित्र निर्माण झाले होते. पण शिवसेनेच्या सदस्यांनी तटस्थ राहणार असल्याचे जाहीर केले होते. अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गफारखान यांनी अर्ज मागे घेतला आणि पवळे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पवळे यांच्या निवडीची घोषणा केली. आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार उपस्थित होते. सभापतिपदी निवड झाल्यानंतर पवळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली व डी. जे. सह विजयी मिरवणूक काढली. मात्र, ही मिरवणूक विनापरवानगी निघाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर वजिराबाद पोलिसांनी डी. जे. जप्त करून सातजणांना ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा महापालिकेचे तीन उपायुक्त वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास दाखल झाले होते. रीतसर तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वजिराबादचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी स्पष्ट केले.