पारगमन कराच्या निविदा निश्चितीसाठी सभा घेण्यास विलंब करून महापालिकेच्या स्थायी समितीने अखेर आपले रंग दाखवलेच. सध्याच्या ठेकेदार कंपनीचा करार संपण्याच्या बरोबर आदल्या दिवशी नव्या ठेका निश्चितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे समितीला वाटाघाटीसाठी वेळ मिळणार असला तरी मनपाचे मात्र काही लाख रूपयांचे नक्की नुकसान होणार आहे.
जकातीच्या ठेक्यात पदाधिकारी व नंतरनंतर प्रशासनही बराच घोळ घालू लागल्याने सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांची जकात बंद करून स्थानिक संस्था कर सुरू केला. मात्र, पारगमन कर आहे तसाच ठेवल्याने नगरमध्ये आता त्याच्या वसुलीच्या ठेक्यात घोळ होऊ लागले आहेत. स्थायी समितीही आता त्यात उतरली आहे. जुना ठेका कधी संपणार व नवा कधी सुरू होणार याची पूर्ण माहिती असताना व करार होण्याची निकड असतानाही स्थायी समितीने सभा घेण्यास उशीर केला आहे. जुन्या ठेकेदार कंपनीचा करार ३० नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्याआधी नव्या ठेक्याची निश्चिती होणे गरजेचे होते. प्रशासनाने त्याप्रमाणे तयारीही केली, मात्र सलग तीन वेळा निविदा जाहीर होऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जुन्याच ठेकेदाराला तब्बल ५ महिने मिळाले. दरम्यान, ठेक्याची २८ कोटी रूपयांची रक्कम २० कोटी करण्यात आली. त्याला २१ कोटी रूपयांचा प्रतिसाद मिळाला. त्याला त्वरित मंजुरी मिळावी म्हणून २४ तासांच्या आत समितीची सभा काढावी अशा शिफारसीचे लेखी पत्र आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आठ दिवसांपूर्वी समितीला दिले. पण त्याची दखल न घेता २९ नोव्हेंबरला सभा आयोजित करण्यात आली आहे.
आता २९ नोव्हेंबरला समितीची मंजुरी मिळाली तरीही संबंधित निविदाधारकाबरोबर लगेचच करार वगैरे करून त्यांना ३० नोव्हेंबरपासून काम सुरू करायला लावणे प्रशासनासाठी अशक्य आहे. त्यामुळे किमान महिनाभर तरी मनपा कर्मचाऱ्यांकडून पारगमन कराची वसुली करावी लागणार आहे. सध्याचा ठेकेदार पारगमन करापोटी महिन्याला मनपात १ कोटी ४७ लाख रूपये जमा करत होता. वास्तविक मनपा कर्मचाऱ्यांकडून त्यापेक्षा जास्त पैसे वसूल होणे अपेक्षित आहे, मात्र जकात वसुलीचा अनुभव लक्षात घेता १ कोटी ४७ लाख तरी वसूल होतात की नाही याचीच शंका आहे. दरम्यानच्या कालावधीत समितीचे सदस्य नव्या ठेकेदाराबरोबर चर्चा वगैरे करून त्याच्या कागदपत्रांची खातरजमा करतील, तपासणी करतील व मग त्याला मंजुरी देतील असे दिसते आहे. यात त्यांची हौस भागणार असली तरी मनपाचे मात्र मोठे नुकसान होणार आहे. 

Story img Loader