महापालिकेच्या स्थायी समितीची परवा (बुधवारी) सभा होत असून त्यात नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी प्रकल्प सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा विषय आहे. सर्जेपुरा येथील मनपाच्या मालकीची व्यायामशाळा चालवायला देण्याचा राजकारणातून बाजूला ठेवलेला विषयही अखेर यावेळी समितीत घेण्यात आला आहे.
रस्त्यांच्या कामांसाठी प्रकल्प सल्लागार कंपनी नियुक्त करण्याबाबत मनपाने जाहीर निविदा मागवल्या होत्या. वारंवार निविदा प्रसिद्ध करूनही त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस गुजरातमधील एका कंपनीने निविदा दाखल केली आहे. ही एकच निविदा आहे. निविदा दाखल केल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने मनपाबरोबर संपर्कच साधलेला नाही. त्यामुळेच कंपनीला या कामात कितपत रस आहे याबाबत शंका आहे. तरीही स्थायी समितीत विषय घेण्यात आला असून ही निविदा मंजूर केली जाणार आहे.
सर्जेपुरा येथील मनपाच्या मालकीची व्यायामशाळा चालवायला देण्यासाठीही मनपाने निविदा जाहीर केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सत्तेतील कोणाला तरी ही व्यायामशाळा चालवण्यासाठी हवी आहे. त्यामुळेच हा विषय स्थायी समितीत घेतला जात नव्हता. पण निविदा दाखल केलेल्यांपैकी सर्वाधिक रकमेची निविदा असणाऱ्याने न्यायालयात जाण्याची तयारी केल्यावर मात्र विषय घेण्यात आला आहे. जादा रकमेची निविदा असल्याने नियमाप्रमाणे समितीला त्यांची निविदा मंजूर करावी लागणार आहे.
नगरोत्थानच्या सल्लागार कंपनीचा उद्या निर्णय
महापालिकेच्या स्थायी समितीची परवा (बुधवारी) सभा होत असून त्यात नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी प्रकल्प सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा विषय आहे.
First published on: 16-10-2012 at 05:11 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standing committee meeting take project decision