महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीची बहुचर्चित सदस्य निवृत्ती प्रक्रिया गुरूवारी अतिशय गुप्त पद्धतीने पार पाडण्यात आली. विशेष म्हणजे माध्यम प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्यास मज्ज्वाव करण्यात आला. बैठकीनंतर आठ सदस्य निवृत्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यपद्धतीमुळे सर्व प्रक्रियेविषयीच संशय निर्माण होत आहे.
या सोडतीपूर्वीच नऊ सदस्यांनी पक्ष आदेशानुसार राजीनामा दिल्यामुळे सर्व सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठय़ा काढल्या जातात की केवळ काही सदस्यांच्या नांवाच्या, याबद्दल उत्सुकता होती. स्थायी समिती सदस्यपदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. त्यात या सोडतीतील चिठ्ठी पद्धतीविषयी शंका उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर, गुरूवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत चिठ्ठीतून नेमकी कोणाची नांवे बाहेर येतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दुपारी चार वाजता सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. बैठकीनंतर चिठ्ठी पद्धतीने काढलेल्या सोडतीत आठ सदस्य निवृत्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात काँग्रेसचे सभापती उद्धव निमसे, मनसेचे गुलजार कोकणी, हेमंत गोडसे, विशाल घोलप व सुवर्णा मटाले, राष्ट्रवादीचे विक्रांत मते, सुफियान जीन, वैशाली दाणी यांचा समावेश आहे. स्थायीतील दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, अजय बोरस्ते, दामोदर मानकर, अशोक मुर्तडक, सूर्यकांत लवटे, सीमा हिरे व बाळासाहेब सानप यांची नांवे चिठ्ठीतून निघाली नाहीत. परंतु शिवसेनेचे बोरस्ते व अपक्ष दामोदर मानकर यांनी आधीच राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. ही एकूणच प्रक्रिया संशयास्पद वातावरणात पार पडल्याने निमसे यांच्या कार्यशैलीविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे.