महापालिका स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांचा राजीनामा आमदारांनी तत्काळ घ्यावा, असे सांगत त्यांना सहा वर्षे अपात्र ठरवण्याची याचिका आपण दाखल करणार असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीस शिवा शिसोदिया व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. धुत्तेकर म्हणाले, की आजपर्यंत पाच वेळा शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची निविदा काढण्यात आली. ती काही कारणाने टाळण्यात आली. लातूर मनपा अस्तित्वात आल्यानंतर दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. पैकी सध्या ज्याबाबत तक्रार चालू आहे, ती निविदा २८ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. दि. ११ सप्टेंबरला निविदा दाखल झाल्या व १३ सप्टेंबरला तांत्रिक, आíथक बाबी तपासण्यात आल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. संजय गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. निविदेतील कंत्राटदाराचे तांत्रिक व आर्थिक निकष नियमाप्रमाणे असून, निविदा स्वीकारण्याची शिफारस मनपा आयुक्तांकडे केली आहे.
पहिल्या तीन निविदांमध्ये संपूर्ण लातूर शहरासाठी एकच निविदा मागवण्यात आली. चौथ्या व पाचव्या निविदेत शहराचे चार झोन करून निविदा मागवण्यात आल्या. आता परत स्थायी समितीने पूर्ण शहरासाठी एकच निविदा मागवण्याचा ठराव केला आहे. दर वेळेस निर्णय बदलण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ आर्थिक भ्रष्टाचार करण्याच्या मानसिकतेतून मनपातील काही पदाधिकारी या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ देत नाहीत, असा आरोप धुत्तेकर यांनी केला.
या निविदा कोणत्या दबावाखाली रद्द केल्या हे समजणे कठीण आहे. आगामी चार दिवसांत कचरा उचलला नाही, तर भाजप १२ ते २५ डिसेंबरदरम्यान लातूरकरांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. यानंतर सह्य़ांची मोहीम भाजपा पदाधिकारी राबवणार आहेत. सह्य़ांचे निवेदन लातूर मनपा आयुक्तांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येणार आहे. आमदारांनी स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा व त्यांना सहा वर्षे अपात्र ठरवण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धुत्तेकर यांनी सांगितले.

Story img Loader