महानगरपालिकेच्या स्थायी समितीवरील निम्म्या सदस्यांच्या निवडी बारगळल्यातच जमा आहे. गेल्या दीड महिन्यांपासून निम्म्या सदस्यांवरच कार्यरत असलेली स्थायी समिती पूर्ण न करण्याचाच सत्ताधा-यांचा मनसुबा दिसतो. अशाच कारणाने मागच्या कार्यकाळात तत्कालीन सत्ताधा-यांवर आगपाखड केल्यानंतर शिवसेना-भाजपने आता त्यांचीच री ओढली आहे.
स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्षांची असली तरी वरिष्ठता क्रमानुसार आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. त्यानुसार किशोर डागवाले (मनसे), नितीन जगताप, दिलीप सातपुते (शिवसेना), नीलिमा गायकवाड (भाजप), मोहिनी लोंढे, सुनील कोतकर (दोघेही काँग्रेस), उडाणशिवे, खान वहाब खान (दोघेही राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. हे आठजण दि. ३० जूनला निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच नव्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात हे सदस्य निवृत्त होऊन दीड महिना झाला तरी मनपातील सत्ताधारी व प्रशासनही ढिम्मच आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीत स्थायी समिती भाजपच्या वाटय़ाला गेली आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे समितीचे सभापती आहेत.
मनपाच्या नगर सचिव कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर महापौरांना मनपाची सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. अशा सभेत राजकीय पक्षांच्या निर्धारित कोटय़ानुसार नव्या निवडी केल्या जातात. ही नावे कळवण्याचा अधिकार मनपातील पक्षांच्या गटनेत्यांना आहेत. त्यांनी शिफारस केलेल्या नावांनुसार ही निवड केली जाते. या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्तावच विलंबाने प्रशासनाला प्राप्त झाला. मात्र त्यावरही पुढची कार्यवाही न झाल्याने निर्धारित मुदतीत नव्या निवडी होऊ शकल्या नाही. आता तर या निवड होण्याची शक्यताच दूरावली आहे.
मनपात याआधीही निम्म्या म्हणजे आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार चालला होता. राष्ट्रवादीची सत्ता असताना समितीचे तत्कालीन सभापती संजय गाडे यांच्या कारकीर्दीत हा प्रकार झाला होता. गाडे यांनी तब्बल वर्षभर निम्म्या सदस्यांवरच समितीचा कारभार हाकला. त्या वेळी याच गोष्टीवर तत्कालीन विरोधी शिवसेना-भाजपने या विरोधात काहूर उठवले होते. मात्र आत तेही त्याच मार्गाने चालले आहेत. विशेष म्हणजे सन ११-१२ च्या मनपाच्या लेखापरीक्षणात लेखापरीक्षकांनी त्या वेळच्या अशाच प्रकाराबद्दल स्पष्ट शब्दांत ताशेरे मारले आहे. त्या वेळी निम्म्या सदस्यांनिशी झालेल्या स्थायी समितीच्या कारभारात मनपाला आलेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याचा अभिप्रायही लेखा परीक्षकांनी दिला आहे.
येत्या डिसेंबरमध्ये मनपाचीच मुदत संपते, त्यापूर्वीच मनपाची निवडणूक होईल. सध्या प्रभागरचनेच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. येत्या दोन, चार दिवसांतच ती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडी बारगळल्यातच जमा आहे.
स्थायीच्या निवडी बारगळल्यात जमा
महानगरपालिकेच्या स्थायी समितीवरील निम्म्या सदस्यांच्या निवडी बारगळल्यातच जमा आहे. गेल्या दीड महिन्यांपासून निम्म्या सदस्यांवरच कार्यरत असलेली स्थायी समिती पूर्ण न करण्याचाच सत्ताधा-यांचा मनसुबा दिसतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standing committees election postponed