उपराजधानीचे रस्ते स्टार बसेस, खाजगी बस कंपन्या, ऑटो आणि सायकल रिक्षाचालकांना अवैध पार्किंगसाठी आंदण देण्यात आले आहेत. सुमारे २५ लाख लोकसंख्येच्या नागपूर शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना शहरातील वाहतूक व्यवस्थेला कोणतीही शिस्त नाही आणि नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्यांवर कुठेही वाहने पार्क केली जात आहेत. सर्वाधिक त्रास स्टार बसेसचा असून सीताबर्डी, बैद्यनाथ चौक, वर्धा रोड परिसरात त्यांच्या रात्रीच्या वेळी राँग साईडने येणाऱ्या बसेस एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात. खाजगी बस कंपन्यांच्या बसेस आणि ट्रक्सदेखील यमदूत बनून उभ्या असलेल्या दिसतात. बैद्यनाथ, रविनगर भागातही अशा अनेक खाजगी कंपन्यांच्या बसेस केव्हाही अंगावर येण्याची भीती असते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. वर्धा रोड, सीताबर्डी आणि बसस्टँड परिसरातील लोकांना याचा सर्वाधिक त्रास भोगावा लागतो.
वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणि जनतेच्या जीविताला कोणताही धोका होऊ नये, यासाठी मोटार वाहन कायदा अस्तित्वात असला तरी खाजगी बस चालक आणि वंश निमयच्या स्टार बसेसना हा कायदा लागू नाही, अशा थाटात त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. गेल्या सहा वर्षांपासून नागपूर शहरातील वाहतुकीसाठी स्टार बसेसचे पार्किंग वाहतुकीसाठी डोकेदुखी झालेली आहे. शहरातील शाळांमधील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि अन्य वाहन चालकांना या समस्यांना सामोरे जावे लागते. यावर योजलेले पर्यायी उपाय फसले आहेत. पर्यायी व्यवस्था देऊनही स्टार बसच्या ‘दादागिरी’पुढे वाहतूक विभाग हतबल झाला आहे. उत्तर अंबाझरी मार्ग, व्हरायटी चौक आणि झांशी राणी चौकातील गर्दी पाहता या ठिकाणी बसेस कशा पार्क केल्या जातात, असा सवाल एका नागरिकाने केला. यामुळे लोकांना रस्त्यावरून जाणेसुद्धा कठीण होते. अनेक वाहन चालकांनी तर या रस्त्याने जाणेच बंद केले आहे.
उत्तर अंबाझरी मार्ग स्टार बसेसच्या ड्रायव्हरच्या पाळ्या बदलण्यासाठी वापरला जातो, असे वंश निमयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यात कारवाई झाली तर बससेवा पुरवणे कठीण होईल. स्टार बसेससाठी पटवर्धन मैदान, त्रिकोणी पार्क, बैद्यनाथ चौकातील महापालिका वर्कशॉप आणि हिंगण्यातील पाच एकर जागा देण्यात आली आहे. हिंगण्यात बसेस पार्क करणे वंश निमयला आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात डिझेल लागते, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. परंतु, शहरातील मोक्याच्या मार्गावर बसेस पार्क करून जनतेच्या जीविताशी खेळण्याच्या मुद्दय़ावर त्याने मौन बाळगले.
शहरातील बससेवेचे कंत्राट मिळालेली स्टार बस ऑपरेटर कंपनी वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टला वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांनी महाराजबाग आणि उत्तर अंबाझरी मार्गावर बस पार्क न करण्याचा इशारा दिला आहे. परंतु, आजही या भागात सर्रास पार्किंग करण्यात आलेले दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा