नागरिकांची नित्याची व महत्त्वाची कामे गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता सात-बारा, फेरफार ही कामे केली जातील. संजय गांधी निराधार योजना, आम आदमी विमा योजना यासारख्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे, असे प्रतिपादन सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत देवरी येथील आयोजित विस्तारित स्वरूपातील समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महसूल व खारजमीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कार्यक्रमाला आमदार रामरतन राऊत, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. िशदे, अप्पर जिल्हाधिकारी के.सी. कारकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल द्विवेदी, देवरीचे सरपंच संतोष मडावी उपस्थित होते. यावेळी देवरी येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्ह्य़ाच्या विकासात लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाधान योजनासारख्या शिबिरांच्या माध्यमातून विकासाची वाटचाल अखंडपणे होत राहील. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, तसेच बालकांना शिक्षणाच्या अधिकारांचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
आमदार नामदेव उसेंडी म्हणाले, प्रशासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असून विकासाची गती या योजनांच्या माध्यमातून आपल्याला वाढवता येईल. आमदार रामरतन राऊत यांनी शासन व प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वयाची प्रशंसा केली व जिल्ह्य़ाच्या विकासासाठी आवश्यक बाबींची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी म्हणाले, सुवर्ण जयंती राजस्व अभियान हे फक्त शिबीर नसून जनजागरण मेळावा आहे व यात पोलीस विभागाचाही महत्त्वाचा वाटा आहे. या योजनेंतर्गत १७५ शिबिरांमधून एकूण २३ हजार दाखल्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले असून, १० हजार फेरफार करण्यात आले आहेत. प्रास्ताविक देवरीचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विविध योजनेंतर्गत लाभार्थीना पीक संरक्षण उपाय यंत्राचे वाटप, पाण्याचे पाईप, विद्यार्थ्यांना सायकल, सौर कंदील, ताडपत्री, दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट कार्याबद्दल सालेकसाचे तहसीलदार शीतलकुमार यादव यांचेही बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले.
शिबिरात विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या वतीने व रक्तदानाबद्दल जनजागृती करणारे स्टॉल्स आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आले होते. विविध सामाजिक संदेश देणारे कलापथकाचे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवई, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त जी.पी. मोहबंशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, गोरेगाव तहसीलदार हंसा मोहने, कार्यकारी अभियंता के.पी. जनबंधू, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा