पहिल्या-वहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त नाना पाटेकर गुरुवारी भरभरून बोलले. राजकारण, समाजकारण आणि औरंगाबादच्या रस्त्यांवरदेखील तिखट शब्दांत त्यांनी ‘प्रहार’ केले.
चित्रपटाविषयीची आपली भूमिका महोत्सवाच्या सुरुवातीलाच मांडताना, ‘प्रत्येक देशात सुख कदाचित वेगळे असेल, पण दु:खाचा धागा समान असतो. हा समान धागा जाणून घ्यायचा असेल, तर हा चित्रपट महोत्सव पाहायलाच हवा. माझ्या दृष्टीने घुसमट बाहेर काढण्याचे साधन म्हणजे चित्रपट. आजुबाजुला जे चालते, ते पाहून मी वेडा झालो असतो किंवा गुन्हेगार झालो असतो. पण खूप काही सांगण्याचे सामथ्र्य या माध्यमात आहे. स्वत:चेच प्रतिबिंब पाहता येते. त्यामुळे जगण्यातला समतोल सांभाळायचा असेल, तर विविध देशांतील चित्रपट पाहायलाच हवेत,’  अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शहरातील प्रोझोन मॉल येथे सुरू झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशांतील १६ चित्रपट दाखविले जाणार आहेत. नाथ ग्रुपचे नंदकुमार कागलीवाल, प्रोझोनचे अनिल इरावणे, उद्योजक उल्हास गवळी यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे. उद्घाटनास ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पुणे, मुंबई येथे ज्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेतले जातात, तसाच महोत्सव येथे व्हावा या साठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. तो या वर्षीपासून सुरू झाल्याने या क्षेत्राला नवे आयाम मिळतील, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. पण खऱ्या अर्थाने महोत्सवाला रंगत आली, ती नानाच्या भाषणाने.
कला आणि कलाकृतीविषयी बोलताना नाना म्हणाले, दररोज भूमिकेत शिरताना नव-नवी सुख-दु:खे बरोबर घ्यावी लागतात. ज्याची अस्वस्थता आणि फरपट थांबते, तो थांबतो, असे हे क्षेत्र. माझे दु:ख चिरंजीव असावे, अश्वत्थामासारखे! त्या जखमेवर तेल टाकून फुंकर मारणारे तुम्ही प्रेक्षक. एरवी आपण जगतच असतो. मी, माझा आणि माझा कोष एवढय़ाच त्या भिंती. पण मला अशा भिंती नकोच असतात. अगदी इथेसुद्धा त्या नको आहेत. चित्रपटाविषयी बोलता बोलताच नाना मध्येच थांबले आणि काही तरी आठवल्यासारखे करून म्हणाले, ‘आपल्या मनपाने आणि सरकारने जरा जवळजवळ यायला हवे. रस्त्यावरून येताना वाईट वाटले हो!’ व्यासपीठावर बसलेले विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे पाहून, ‘माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. काही तरी करा हो. ‘आडवळणा’ने का असेना. ते कसे करायचे, हे तुम्हाला माहीत आहे. पण काहीही करा, तेवढं आवर्जून मनावर घ्या. तुम्ही माझ्या मुलासारखे आहात,’ असे ते म्हणाले. नानाच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्या आणि शिट्टय़ा वाजल्या.
रस्त्यांच्या प्रश्नावर फटकारल्यानंतर नाना पुन्हा चित्रपटांच्या मांडणीकडे वळाले. ते म्हणाले, या क्षेत्रात काही माणसे खूप चांगली होऊन गेली. ‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक करायचो, तेव्हा ५० रुपये ‘नाईट’ मिळायची. तेव्हा टाईमपास म्हणून पत्ते खेळायचो. तेव्हा अशोक सराफ मुद्दामच हरायचे. कळत होते, ते का हरायचे. त्यांना तेव्हा अडीचशे रुपये मिळत आणि मला ५० रुपये. अशी खूप माणसे आहेत. जब्बार पटेल त्यांच्यापैकीच. त्यांच्याविषयी भलंबुरं बोलू शकतो. पण माझ्या भाषणाच्या आधी ते माझ्याविषयी भलंच बोलून गेले असल्याने त्यांच्याविषयी भलंच बोलतो. हा माणूस तुमच्या नकळत तुमच्याकडून काढून घेतो. व्यक्त करायला लावताना डोक्यावर बसत नाही. त्यामुळेच तो मोठा आहे. या क्षेत्रात येण्याचे मुख्य कारण मनाचे समाधान आहे. प्रत्येक चित्रपटाचा गाभा दु:ख असतो. तो समान धागा भिडला की रसरसून सारे काही पुढे येते, तेव्हा समाधान मिळते.
एका वेगळ्याच उंचीवर बोलताना नाना पाटेकरांना सभागृहातून काही जणांनी ‘डायलाग’ म्हणून दाखवा, अशी विनंती केली. त्याला त्याच्याच भाषेत नानाने उत्तर दिले. तो म्हणाला, ‘डायलाग ऐकायला तिकीट काढून ये ना.’ पण नंतर त्या रसिकाला नाखूश न करता नानाने त्याच्या धीरगंभीर आवाजात कविता सादर केली आणि तीच दाद घेऊन गेली.
तत्पूर्वी सोनाली कुलकर्णी यांनीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गरज सांगितली. इटलीतील चित्रपट महोत्सवात ज्यू लोकांच्या गुलामगिरीबद्दलचा चित्रपट पाहिला आणि थक्कच झाले. तेथील समाजकारण, राजकारण आणि तेथील वेदना समजून घेताना व्यक्तिरेखा कशा समजून घ्याव्यात, याचा वस्तुपाठ जब्बार पटेल यांनी घालून दिला आणि आपण घडलो, असे त्या म्हणाल्या.
मी आपला अभिनेताच बरा!
स्मिता पाटील मोठी अभिनेत्री होती. तिनेच मला चित्रपटात आणले. हे मोठे प्रभावी माध्यम आहे. मी येथून काहीही सांगू शकतो. गेल्या काही दिवसांत निवडणुकीला उभे राहा, असे म्हणणारे अनेकजण येत आहेत. मी एका पक्षात यायचो आणि त्या पक्षाच्या प्रमुखाने केलेल्या विधानाला उत्तर देताना तो नेता कसा मूर्ख आहे, असे म्हणायचो. त्याला काही कळत नाही, असेही आपण म्हणून टाकू. त्याच्यामुळे पंचायत होते. आतमध्ये जी खदखद आहे, ती दरवेळी व्यक्त करताच येते, असे राजकारणात घडत नाही. म्हणून मी आपला अभिनेताच बरा. त्यामुळे तो विषयच आता माझ्यासाठी नाही. आपण जोपर्यंत नेत्यांचे मिंधे होत नाही, तो पर्यंत काहीही बिघडत नाही. आपण बोलू शकतो. अजूनही मी माझी किंमत ठरवलेली नाही. तशी किंमत ठरविली जाणे चुकीचे असते, असेही नाना पाटेकर म्हणाले.