युवकांच्या सर्वागीण विकासासाठी राज्याचे क्रीडा धोरण असून, या धोरणाच्या अंमलबजावणीतून राज्यातील खेळाडूंचा निश्चितच विकास साधेल. परभणीत अनेक क्रीडा वास्तू तयार झाल्या, परंतु यापुढे त्या वास्तूंचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. यासाठी खेळाडू व संघटना यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
जिल्हा बॅडिमटन असोसिएशनच्या वतीने येथे वरिष्ठ आंतरजिल्हा व राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पध्रेचे सोमवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, तर प्रमुख म्हणून खासदार गणेशराव दुधगावकर, माजी आमदार सुरेश देशमुख, महापौर प्रताप देशमुख, गटनेते भगवान वाघमारे आदी उपस्थित होते. स्पर्धा २३ नोव्हेंबपर्यंत चालणार आहे.
प्रारंभी डॉ. हेमंत गुलवाडी, अनुपमा देशमुख, रफीक बोधानी, सुधीर मांगुळकर यांनी क्रीडामशाल आणली. क्रीडाज्योतीचे प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महापौर देशमुख म्हणाले, की क्रीडा संकुलातील वास्तूंचा वापर, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संघटनेला दिली, तर खेळाला प्रोत्साहन मिळेल अन् वास्तूची देखभालही होईल. परभणीत होत असलेल्या राज्यस्तरीय स्पध्रेचे नेटके आयोजन पाहून आता राज्य संघटनेने परभणीला राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची जबाबदारी द्यावी, असे आवाहन माजी आमदार देशमुख यांनी केले. केंद्र सरकारच्या क्रीडा विकासासाठी अनेक योजना आहेत. परंतु राज्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय नसल्याने निधीचा वापर होत नाही, अशी खंत खासदार दुधगावकर यांनी व्यक्त केली.
वरपुडकर म्हणाले, की राज्याच्या क्रीडा धोरणाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला. सवलतीचे गुण व शासकीय नोकरीत आरक्षण यांसारख्या सवलती सरकारने दिल्याने क्रीडापटूंना या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. आता लाल-तांबडय़ा मातीतील खेळाडू ऑलिम्पिक स्तरावर अधिक संख्येने पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे सचिव रवींद्र देशमुख यांनी केले. संजय देशमुख, डॉ. विवेक नावंदर, तहसीन अहमद खान, संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आशिष बाजपेई, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणव अशोक, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील मोडक यांनी केले.
१८ जिल्हय़ांचे १९८ खेळाडू
पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतून १९८ खेळाडू व प्रशिक्षक दाखल झाले असून, बुधवारपासून (दि. २०) होणाऱ्या वैयक्तिक गटातील स्पध्रेसाठी उर्वरित खेळाडू मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. दररोज दिवसा व रात्री हे सामने होणार आहेत.

Story img Loader