स्टेट बँकेच्या सजग अधिकाऱ्यामुळे उत्तर प्रदेश शासनाची १९ कोटींनी फसवणूक करण्याच्या प्रयत्नातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याने अशा रितीने आणखी गुन्हे केल्याची पोलिसांना शंका आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वैशालीनगर शाखेत मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. बँकेत १९ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश वटण्यासाठी आला. एवढी मोठी रक्कम आणि रोख काढत असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना शंका आली. ज्याने हा धनादेश सादर केला त्याला अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. त्याने त्याचे नाव सचिन मोतीराम राऊत सांगितले. मोठी रक्कम असून एवढी रोख नाही, थोडा वेळ थांबावे लागेल, असे सांगत त्याला अधिकाऱ्यांनी बसवून ठेवले.
अधिकाऱ्यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल मुरलीधर मानापुरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. एवढी मोठी रक्कम पाहून त्यांनाही शंका आली. भारतीय स्टेट बँकेच्या लखनऊ येथील जवाहर भवन शाखेचा हा धनादेश होता. तेथील ग्रामीण रोजगार हमी योजना समिती, या नावाने असलेल्या खात्याचा उल्लेख या धनादेशावर होता. मानापुरे यांनी तातडीने तेथील शाखेत संपर्क साधला. असा कोणताही धनादेश दिला गेला नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याचे बिंग फुटले. लगेचच मानापुरे यांनी तातडीने पाचपावली पोलिसांना पाचारण केले आणि ही बाब सांगितले. आरोपी सचिन मोतीराम राऊत याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याची शंका आली. त्याने त्याचे खरे नाव लक्ष्मण उमराव लाटकर (रा. तांबट लेआऊट, खरबी रोड) सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने हा धनादेश कसा मिळविला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Story img Loader