वन्यजीव कायदा आणि संग्रहालय कायदा या दोन्हीनुसार वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करता येत नाही. अतिशय अटीतटीची परिस्थिती असेल तरच त्या नष्ट करता येतात, पण त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी आवश्यक ठरते. स्थानिक मध्यवर्ती संग्रहालयाने एक, दोन नव्हे, तर तब्बल १२३६ वन्यजीव ट्रॉफीज वनखात्याच्या परवानगीशिवायच नष्ट केल्या. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर वनखात्याने चौकशी समिती गठीत केली, पण आता या समितीच्या अहवालालाच नाकारण्याचा प्रयत्न खुद्द प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून होत असल्याने हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट होण्याच्या तयारीत आहे.
ब्रिटीशकालीन संग्रहालयातील वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करण्याचे प्रकरण वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आला. संग्रहालयातील अनेक दुर्मिळ वस्तूंच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या खराब झाल्या. त्यात वन्यजीव ट्रॉफीजचाही समावेश होता. तत्कालीन अभिरक्षक मधुकर कठाणे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी न घेता परस्पर या ट्रॉफीज जाळून टाकल्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना वनखात्याची भूमिकासुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. लोकसत्ताने सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर वनखात्याने त्रिसदस्यीय समिती गठीत केली. जुलै २०१४ मध्ये या समितीने संग्रहालयाची चौकशी सुरू केली. संग्रहालय प्रशासनाने प्रत्येक वेळी समितीला धुडकावून लावले. मात्र, सदस्यांच्या खंबीर भूमिकेमुळे ही चौकशी पूर्ण झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच समितीने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याकडे अहवाल सादर केला. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत या अहवालावर वनखात्याने त्यांची भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. तत्कालीन अभिरक्षकांच्या दबावामुळे आणि समितीच्या अहवालानंतर वनखात्यावरही दोषारोप सिद्ध होत असल्यानेच तर या अहवालाचे गुपित दडवून ठेवण्यात आले नाही ना, असा संशय आता व्यक्त होत आहे.
या संदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याशी संपर्क साधला असता, समितीच्या अहवालात आक्षेप घेण्यासारखे मुद्देच नाहीत. त्यामुळे आपल्या पद्धतीने आता गाईडलाईन्स देऊ, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. वन्यजीव संरक्षण कायदा आणि संग्रहालयाच्या कायद्यातसुद्धा वन्यजीव ट्रॉफीजच्या मालकी प्रमाणपत्रासंदर्भात संग्रहालयाला सवलत आहे, पण वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करण्याचा अधिकार नाही.
हैदराबाद येथील सालारजंग संग्रहालयासह देशभरातील नामांकित संग्रहालयांच्या संचालकांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, सर्जन भगत यांनी चक्क संग्रहालयाला वन्यजीव ट्रॉफीज नष्ट करण्याचे अधिकार असल्याचे सांगून कायद्यापेक्षा संग्रहालय श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केल्याची टीका आता सर्व बाजूने होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा