अंध व अपंगांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाचाच कारभार पंगू बनला आहे. त्यांचे तांत्रिक व मानसिक दोष दूर न झाल्याने राज्यातील सुमारे ८९६ अपंग शाळांतील ४१ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.
समाजकल्याण खात्याची समाजसेवार्थ ही वेबसाईट असून त्यामार्फत ऑनलाइन पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ही वेबसाइटच अपंग बनल्याने ऑनलाइन पगार करण्यात तांत्रिक अडचणी आल्या. खात्याकडे कोटय़वधी रुपयांचा निधी पडून आहे. पण तांत्रिक कारणामुळे तीन महिन्यांचे अपंग शाळा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. समाजकल्याण खात्याचे सचिव आर. डी. िशदे यांनी आता ऑनलाइन पगार होत नसल्याने पूर्वीच्याच पद्धतीने पगार करण्याचे स्पष्ट केले आहे.
समाजकल्याण विभागामार्फत मूकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद मुलांच्या शाळा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चालविल्या जातात. या शाळेच्या कर्मचाऱ्यांना पगार करण्याकरिता पूर्वी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाची मंजुरी घ्यावी लागत असे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार चार ते सहा महिने विलंबाने होत असत. अपंग शाळा कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सचिव िशदे यांना भेटले. त्यांनी अपंगाप्रति संवेदनशीलता दाखवून तातडीने हे अधिकार समाजकल्याण अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश काढले. त्यानंतर पगार सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजसेवार्थ ही समाजकल्याण खात्याची वेबसाईट आहे, पण त्यामध्ये तांत्रिक दोष तयार झाले. त्यामुळे आता ऑनलाइन पगाराला अद्याप सुरुवात झालेली नाही. ऑगस्ट, सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यांचे पगार थकले आहेत. संघटनेने दिवाळीला आंदोलन केल्याने ऑक्टोबर महिन्याचा पगार करण्यात आला. आता तांत्रिक दोष दर होत नसल्याने पूर्वीच्याच पद्धतीने पगार करण्याचा विचार समाजकल्याण विभागाने चालविला आहे.
नगर जिल्ह्यात अंधांच्या दोन शाळा होत्या. त्यापैकी नॅबची शहरातील एक शाळा सुरू असून करंजी (ता.पाथर्डी) येथील शाळा बंद पडली आहे. अस्थिव्यंगाची एक व मतिमंदांच्या दोन शाळा असून ३१४ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पगारासाठी मोठी यातायात करावी लागत आहे. कर्मचारी संघटनेचे संजय साळवे, प्रशांत घाडगे, नारायण डुकरे, तान्हाजी देशमुख, चांगदेव खेमनर, संजय बलाडे, तमन्ना बडवई यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 लवकरच पगार
जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाजसेवार्थ या वेबसाईटमध्ये निर्माण झालेला तांत्रिक दोष लवकरच दूर होणार असून, त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने पगार केले जातील, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader