प्रादेशिक पक्ष राज्याच्या अस्मितेचा व हिताचा विचार करतात. त्यामुळे राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांनाही महत्त्व आहे, असे प्रतिपादन आमदार व विधानसभेतील मनसेचे गटनेता बाळा नांदगावकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने विधिमंडळात आयोजित ‘संसदीय लोकशाहित प्रादेशिक पक्ष व अपक्षांचे स्थान आणि महत्त्व’ या विषयावर नांदगावकर बोलत होते. यावेळी आमदार मंगेश सांगळे उपस्थित होते.
देशातील जवळपास सर्वच राज्यात प्रादेशिक पक्षाचे महत्त्व वाढले आहे. त्यांना राज्याची अस्मिता जपावी लागते. प्रादेशिक विचार, भूमिका मांडावी लागते. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रयत्नही करावे लागतात, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले. जीवनातील सर्वच क्षेत्रात राजकारणाला महत्त्व आहे. त्यापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही. राजकारण वाईट नसून त्यातील व्यक्ती व प्रवृत्ती वाईट असू शकतात. त्यासाठी तरुण पिढीने राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यात राजकारणाला महत्त्व द्यावे, असेही नांदगावकर यांनी सांगितले.
 यावेळी आमदार सांगळे यांनी परिचय करून दिला. संचालन विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांनी तर आभार गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी लोमेश देशमुख याने मानले.