प्रकाशन माध्यमात मालक, संपादक व जिल्हा वार्ताहर यांच्याद्वारे संकलित बातम्या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर त्यांना वाचकांपर्यंत पोहोचविण्यात वृत्तपत्र विक्रेता हा याच माध्यमातील अखेरचा घटक असतो. इतर सर्वाचा तर आपापल्या क्षेत्रात दरारा असतो, पण वृत्तविक्रेता हा अखेरच्या घटकापर्यंत उपेक्षितांचे जीवनच जगत राहतो, या घटकाला असंघटित कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करून त्यांच्या पुढील आयुष्याकरिता प्रशासनाच्या माध्यमातून त्याला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटित करण्याच्या हेतूने हे त्रवार्षिक संमेलन यावर्षी गोंदियात केले जात असल्याची माहिती वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी संघटनेचे सचिव विनोद पन्नासे, उपाध्यक्ष दिनेश उके, गोंदिया शहर संघटनेचे प्रमोद भोयर, नागपूर संघटनेचे बंडू फुलकर, रवींद्र गायकवाड, भंडाराचे किशोर मोरे, चंद्रपूर संघटनेचे सूर्यान काल्रेकर, सुभाष मोतेवार आदी उपस्थित होते. या संमेलनाच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना पाटणकर म्हणाले, २६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास संमेलनात येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून घेतल्या जाणार आहेत. २७ जानेवारीला सकाळी अधिवेशनाचे उद्घाटन समारंभ होईल. नंतर खुले अधिवेशनाच्या माध्यमातून वर्ष २०१३ या वर्षांत संघटनेद्वारे आपल्या मागण्यांकरिता आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. अधिवेशन येथील द्वारकालॉन येथे होणार असून  उद्घाटन विदर्भ विभागाचे माहिती संचालक भी.म. कौशल यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक राहतील. यावेळी आमदार राजेंद्र जैन, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार नाना पटोले, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सरचिटणीस सुनील पाटणकर, उपाध्यक्ष दिनेश उके राहणार आहेत.