सातारा येथील वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीतर्फे यंदा वन्यजीव संरक्षण व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल ठाणे जिल्ह्य़ातील बदलापूर येथील प्रथमेश घडेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्प व इतर वन्यजीवांचे संरक्षण तसेच छायाचित्रांसाठी प्रथमेशचा यंदा गौरव करण्यात आला.  स्केल्स अ‍ॅण्ड टेल्स कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेद्वारे गेली दहा वर्षे प्रथमच वन्यजीव संरक्षण तसेच छायाचित्रण करीत आहे.   लोकवस्तीत अडकलेल्या, जखमी झालेल्या सर्प व इतर प्राणी-पक्ष्यांना वाचवून, गरजेनुसार त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जंगलात सुरक्षितरीत्या सोडण्याचे काम प्रथमेश आणि त्यांचे मित्र करतात.  त्यांच्या संस्थेने आतापर्यंत दहा हजार सर्पाचे जंगलात पुनर्वसन केले आहे. प्रथमेश मात्र पुनर्वसनाबरोबरीनेच वन्यजीवांचे छायाचित्रणही करीत आहेत. निरनिराळ्या जातींच्या सर्पाबरोबरच पाल, सरडे, कासव, घोरपड, बेडूक, कोळी, विंचू आदी प्राण्यांची छायाचित्रे त्यांनी काढली आहेत.