सहकार क्षेत्रातील अग्रगण्य तसेच स्थापनेपासून नफ्यात असणाऱ्या जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला बहुराज्यस्तरीय दर्जा प्राप्त करण्यासंदर्भात रिझव्र्ह बँकेकडून ना हरकत पत्र प्राप्त झाले आहे. खानदेशातील असा दर्जा मिळविणारी ही पहिलीच सहकारी बँक असून त्यामुळे शेजारील मध्य प्रदेशातही बँकेचा शाखा विस्तार होणार आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटकर यांनी बँकेने बहुराज्यस्तर दर्जा प्राप्त करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने ठरविलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. बँकेचा स्वनिधी १०१ कोटी असून भांडवलपर्याप्तता १३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. थकीत कर्जाचे प्रमाण १.९५ इतके अत्यल्प असून बँक स्थापनेपासून म्हणजे ७० वर्षांपासून सतत नफ्यात आहे. रिझव्र्ह बँकेचे निकष पूर्ण केल्यामुळे बँक मध्य प्रदेशात व्यवहार सुरू करून शाखांचा विस्तार करू शकणार आहे. तसेच वैधानिक लेखा परीक्षक नेमणूक करण्याचाही अधिकार बँकेस प्राप्त झाला असल्याचे पाटकर यांनी कळविले आहे.
जळगाव पीपल्स बँकेचा एकत्रित व्यवहार १३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून जिल्ह्यासह धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे २७ शाखा कार्यरत आहेत.