राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील. त्यांच्यासाठी कामाला लागा. येत्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढवेल व त्याची सुरुवात नांदेडपासून होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ातील लोहा येथे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानिमित्त आयोजित मेळाव्यात पिचड बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावरही या वेळी त्यांनी टीका केली.
पिचड म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा अभ्यास कच्चा आहे. राष्ट्रवादीसोबतची सत्ता सोडण्याची त्यांची तयारी आहे काय? ‘आदर्श’पासून भ्रष्टाचाराची सुरुवात झाली. ती आधी दुरुस्त करा. यापुढे राष्ट्रवादी स्वबळावरच निवडणुका लढवेल. त्यासाठी कामाला लागा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामुळे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यामुळे नांदेडमधूनच स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू करू. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली. पवार म्हणाले की, ‘आदर्श’वादाची झूल पांघरून काँग्रेसचे या भागातील नेतृत्व आर्थिक ताकदीच्या बळावर राजकारण करीत होते. या नेतृत्वाला आव्हान देण्याचे काम प्रताप पाटील यांनी केले. त्यांच्याकडे संघटन कौशल्य व विकासाची जाणीव आहे. ते राष्ट्रवादीत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
मेळाव्यास गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, सूर्यकांता पाटील, कमलकिशोर कदम, बापूसाहेब गोरठेकर, डी. बी. पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.
मेळाव्याला लोह्य़ाचे राष्ट्रवादीचे आमदार शंकरअण्णा धोंगडे मात्र अनुपस्थित होते. त्यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत होते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता.
चिखलीकर म्हणाले की, या पूर्वीच्या निवडणुका ‘शिलाई मशीन’ या चिन्हावर लढवत होतो. या पुढे निवडणूक चिन्ह ‘घडय़ाळ’ असेल. चिखलीकर यांच्यावर एका मतदारसंघापुरती नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्य़ाची जबाबदारी सुपूर्द केली जाईल. त्यामुळे त्यांची सीमारेषा केवळ लोहा तालुका नाही, असे सांगून अजित पवार यांनी जिल्ह्य़ात काँग्रेसबरोबर दोन हात करण्याची तयारी सुरू केली असल्याचे सूतोवाच केले.

Story img Loader