राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेस उद्यापासून (मंगळवार) वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते होत आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातील ९ विभागांतून सुमारे ५५० हून अधिक खेळाडू, पंच, व्यवस्थापक, मार्गदर्शक आज सायंकाळी येथे दाखल झाले. प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार यांनी ही माहिती दिली.
उद्घाटनास आ. अरुण जगताप, आ. अनिल राठोड, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार उपस्थित राहतील. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा व राज्य बॉक्सिंग संघटना यांनी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उद्यापासून गुरुवारपर्यंत (दि. २२) १४, १७ व १९ वयोगटातील मुलांच्या, दि. २२ रोजी मुलींच्या संघाचे आगमन होईल व त्यांच्या १७ व १९ वयोगटातील खेळाडूंच्या स्पर्धा दि. २३ व २४ रोजी होणार आहेत, असे संघटनेचे जिल्हा सचिव गफार शेख यांनी सांगितले. स्पर्धेसाठी संकुलातील बहुउद्देशीय सभागृहात दोन रिंग बसवण्यात आल्या आहेत.
स्पर्धेत नगरचे उदयोन्मुख खेळाडू आरती भोसले, उस्मान शेख, जुनेद शेख, स्वप्नील चोरडिया, संदिप जाधव हे सहभागी होऊन पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, नाशिक औरंगाबाद, नागपूर, अमरावती व क्रीडा प्रबोधिनी अशा ९ विभागांतील खेळाडू सहभागी होतील. मुलांची राहण्याची व्यवस्था संकुलातील वसतिगृहात व पटेलवाडीत, मुलींची व्यवस्था ओम मंगल कार्यालयात, तर भोजन व्यवस्था पटेलवाडीत करण्यात आली आहे. या स्पर्धेतून बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे दि. ६ ते ९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा राज्याचा संघ निवडला जाईल.    
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुणांकन
स्पर्धेतील लढतीचे गुणांकन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाणार आहे. आज सायंकाळी झालेल्या स्पर्धा संयोजन समितीच्या सभेत विभागांच्या खेळाडूंच्या लढतीत त्या विभागांचे पंच काम पाहणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader