बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक बोलत असतो आणि विद्यार्थी ऐकत असतात. ही पद्धत बदलायला हवी. संवाद दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. केवळ पुस्तके वाचून भागणार नाही, तर वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून उत्सुकता वाढविली गेली तरच काही नवीन वैज्ञानिक प्रयोग पुढे येतील, असे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.
‘इन्स्पायर अवार्ड’अंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंडे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. के. जरग व विभागीय शिक्षण उपसंचालक सुखदेव डेरे यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यस्तरावरील प्रदर्शनात येणारे प्रयोग तसे फारसे नवीन नाहीत. तेच तेच प्रयोग होतात. प्रयोगात अधिक नावीन्य आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढायला हवी. शिक्षणात दोन्ही बाजूंनी संवाद असेल तरच वैज्ञानिक जाणिवा विकसित होतील, असे दर्डा म्हणाले.
प्रदर्शनात २३६ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. प्रदर्शनातून १२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड होणार आहे. ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रदर्शन होईल. प्रदर्शनात सहभागी होण्यास आलेल्या विद्यार्थ्यांशी दर्डा यांनी संवाद साधला. या विद्यार्थ्यांमध्ये एवढा आत्मविश्वास होता की, शिक्षण हे ज्ञान मिळविण्यासाठी आहे. राज्य कारभार चालविण्यासाठी आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आदर्श असल्याचे दर्डा यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State science exhibition under inspire award