चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील जयजवान जयकिसान सहकारी साखर कारखाना पाच वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यासाठी काढण्यात आलेली निविदा अव्यवहार्य असून, ती रद्द करावी. तसेच कारखाना कर्जमुक्त होईपर्यंत दीर्घमुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी साखर कारखाना कृती समिती व ऊस उत्पादक सभासदांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या गरकारभारामुळे जयजवान जयकिसान कारखाना २००९पासून बंद पडला. १२५० मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या या कारखान्याकडे दहा हजार सभासद असून, ४ ते ५ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. आजारी असलेला हा कारखाना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची निविदा राज्य सहकारी बँकेने नुकतीच काढली आहे. बंद पडलेला हा कारखाना चालू करण्याचा दुरुस्ती खर्च १५ ते २० कोटी रुपये असू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्रत्येक कारखान्याची आíथक परिस्थिती, गाळपक्षमता, कार्यक्षमता, कारखाना चालू करण्यासाठी लागणारा खर्च याचा आíथक तळेबंद काढूनच या कारखान्याची निविदा काढण्यात आली पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारखान्याच्या सारासार आíथक परिस्थितीचा विचार न करता सहकारी बँकेची देणी व व्याज गृहीत धरून ही अर्धवट स्वरूपाची निविदा काढण्यात आली आहे. नळेगाव कारखान्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, त्याचप्रमाणे कारखाना चालवण्यासाठी लागणारे भागभांडवल याचा विचार केल्यास पाच वर्षांच्या कालावधीत कारखाना पूर्णत: कर्जमुक्त होणे अशक्य आहे. राज्य शासनाने २९ नोव्हेंबर २००५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे दीर्घमुदतीसाठी भाडेतत्त्वावर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अव्यवहार्य निविदा रद्द करून कारखाना दीर्घमुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, संयोजक माधवराव पाटील टाकळीकर, रामराव कुदरे, त्र्यंबक शिवनगे, चन्नाप्पा मुदगडे, मेहमूद तांबोळी, िलबराज लगसकर आदींनी केली आहे.

Story img Loader