शिवसंग्राम संघटनेने शनिवारी येथे आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जागर परिषदेचे निमंत्रण देऊन तिघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून आमदार विनायक मेटे यांना जागर परिषद घेण्यास बंदी घालावी, तसेच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेटे व कार्यक्रमाचे आयोजक किशोर चव्हाण यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कल्पतरू युवा विकास मंचाने सोमवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तांकडे केली.
मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्दय़ावर शिवसंग्राम संघटनेने जागर परिषद आयोजित केली होती. ही परिषद छावाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. परंतु प्रत्यक्षात शिवसंग्रामच्या अध्यक्षांनी छावाचे अविनाश चिंधे, सुनील कोटकर पाटील व गितेश सोनवणे यांना आमंत्रणाचा एसएमएस व दूरध्वनी केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी गेलेले हे तिघे मेटे यांना निवेदन देत असताना दहा-बाराजणांनी त्यांना मारहाण केली. या वेळी शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे छावाच्या मारहाण झालेल्या सदस्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार होण्याचे टाळले गेले असल्याचे सांगण्यात येते. सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारे घटना घडणे ही लाजीरवाणी बाब असल्याचे सांगितले जाते. दंगल घडविण्याच्या उद्देशाने छावाचे कार्यकर्ते आल्याचे आयोजकांनी म्हटले. परंतु यात खरे काय व काय खोटे हे कळणे अशक्य आहे. सामाजिक व्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न मेटे यांनी केल्याचे म्हटले जाते. तसेच आरक्षण प्रश्नी मराठा समाजाचा आमदार विनायक मेटे यांनी विश्वासघात केल्याचे पत्रकात म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा तापविला जात असल्याकडेही पत्रकात लक्ष वेधले आहे. अध्यक्ष संजय तांबे, उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेटे, सचिव सुशील बोडखे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, चेतन डाखोरे, प्रशांत कदम, प्रमोद डोंगरे आदी तेराजणांची नावे व सह्य़ा या निवेदनावर आहेत.

Story img Loader