कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा पुतळा उभारला जाणार असल्याचे भविष्य काही वर्षांपूर्वी एका भविष्यवेत्त्याने लिहून ठेवले आहे. पाडगावकर यांच्याबाबतीत त्या ज्योतिषाने सांगितलेली सर्व भाकिते खरी ठरली असून आता केवळ हे एकच भविष्य खरे ठरायचे बाकी आहे..
दादर-माटुंगा कल्चरल सेंटरच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या काव्यरंग महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाडगावकर यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दस्तुरखुद्द कुवळेकर यांनीच पाडगावकर यांच्या या भविष्याविषयी जाहीरपणे माहिती दिली.
गेल्या पिढीत स. ह. शुक्ल हे नाटकककार होऊन गेले. शुक्ल पत्रिका पाहून भविष्य आणि ज्योतिष सांगायचे. पाडगावकर तेव्हा शाळकरी वयाचे होते. शुक्ल अचूक भविष्य सांगतात, अशी त्यांची ख्याती होती. पाडगावकर यांची पत्रिका शुक्ल यांनी त्यावेळी पाहून हा मुलगा पुढे मराठीतील प्रसिद्ध कवी होणार असल्याचे भविष्य सांगितले होते, अशी कुवळेकर यांनी उपस्थितांना दिली.
पाडगावकर यांचा पुतळा उभारला जाईल, या भाकिताव्यतिरिक्त शुक्ल यांनी सांगितलेली सर्व भाकिते आजवर खरी ठरली आहेत. शुक्ल यांनी पाडगावकर यांना सर्व भविष्य कागदावर लिहून दिले असून तो कागद पाडगावकर यांनी आत्तापर्यंत जपून ठेवला असल्याचेही कुवळेकर म्हणाले.
आणि शेवटी जाता जाता स्वत: मंगेश पाडगावकर हेही उत्तम ज्योतिषी आहेत, अशी त्यांच्याबद्दल कोणाला माहिती नसलेली खास बाबही कुवळेकर यांनी रसिकांसमोर उघड केली..

Story img Loader