स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दराचे आंदोलन एकरकमी २६५० रुपयांवर तोडगा स्वीकारून मागे घेतल्याबद्दल जिल्ह्य़ात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून वाळवा तालुक्यातील साखराळे येथे शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला. तर आधारभूत किमतीपेक्षा शेट्टींनी कमी उचल मान्य कशी केली असा सवाल संजय कोले यांनी केला आहे.  लोकसभेच्या निवडणुकीतील तडजोडीपोटीच शेट्टींनी ऊस उत्पादकांचा बळी दिला असल्याचा आरोप सांगली जिल्ह्य़ात ऊस उत्पादकांकडून होत आहे.
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन हजाराच्या पहिल्या उचलीसाठी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. अंतिम क्षणी दोन दिवसांची मुदत देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असताना ऐनवेळी तडजोडीची भूमिका घेत २६५० वर तडजोड केली.  ही तडजोड करीत असताना कारखान्यांना २२०० रुपये रोखीने व उर्वरित ४५० रुपये केंद्र व राज्य शासनाच्या मदतीनंतर देण्याचे मान्य करून हमीदवाडा साखर कारखाना व स्वाभिमानी संघटना यांच्यात दिलजमाई झाली. खा. सदाशिवराव मंडलीक व राजू शेट्टी यांनी संयुक्तपणे काढलेल्या निवेदनात ही माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.  मात्र ऊस उत्पादक व राजकीय विरोधकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटताच एकरकमी २६५० रुपये द्यावेत. अन्यथा एक वर्ष फुकट ऊस घ्यावा अशी घोषणा करीत खा. शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
    साखर कारखान्याचा गाळप हंगाम दिवाळीपासून सुरू व्हायला हवा होता. मात्र दरासाठी आंदोलन सुरू झाल्याने एक महिना गाळप हंगाम लांबला आहे. बारा महिन्याचा ऊस असेल तर साखरेचा उतारा चांगला मिळतो. त्याच बरोबर उसाला वजनही चांगले भरते. एक महिना हंगाम लांबल्याने उसाला तुरे येण्याची अवस्था निर्माण होणार आहे.  एकाच वेळी सगळीकडे ऊस तोडी करणे अशक्य असल्याने उसाचे वजन व उतारा घटण्याचा धोका वाढला आहे. परिणामी लांबलेला हंगाम आणि मिळणारा दर पाहता खा. शेट्टी यांनी यंदा लोकसभा समोर ठेवून शेतकऱ्यांचे  हित साधण्यापेक्षा राजकीय तडजोडीला प्राधान्य दिल्याचा आरोप सर्वच स्थरातून होत आहे.
    ऊस आंदोलनाबाबत शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर दंगल घडविण्याचा कट केल्याचा आरोप पत्रकार बठकीत केला.  यानंतर याची प्रतिक्रिया म्हणून इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदविला.  लोकसभेची तोंडावर आलेली निवडणूक ही जशी या आंदोलनाच्या मुळाशी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मतावर डोळा ठेवून केले जाणारे राजकारणही आहे.
    शेट्टींच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी इस्लामपुरात मोर्चा काढून निषेध केला.  याला प्रतिउत्तर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी इस्लामपूर येथे शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.  आंदोलनाबाबत व तडजोडीबाबत होणाऱ्या टीकेचा समाचार या मेळाव्यात घेतला जाणार आहे.  संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांनी सांगितले की, या मेळाव्यात खा. राजू शेट्टी, सदाभाऊ  खोत हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा