मराठी भाषेच्या परीक्षेवरुन निर्माण झालेला वाद
मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने आरोग्य संचालकांनी एका डॉक्टरला १५ लाखाचा दंड ठोठावला. या आदेशाच्या विरोधात सदर डॉक्टरने ‘मॅट’मध्ये धाव घेऊन दाद मागितली असता ‘मॅट’ने आरोग्य संचालकांच्या आदेशाला स्थगनादेश दिला.
डॉ. विजय बानोडे असे डॉक्टरचे नाव असून ते राज्य कर्मचारी विमा महामंडळात फिजिओथेरेपी म्हणून काम करत होते. ३० जून २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. महामंडळाच्या नियमानुसार त्यांना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही, असे सांगून राज्याच्या आरोग्य संचालकांनी त्यांच्यावर १५ लाखांचा दंड ठोठावला. नोकरीच्या काळात जे वेतन घेतले ते परत करावे, असेही आदेशात नमूद केले.
या आदेशाला डॉ. बानोडे यांनी ‘मॅट’ (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद)मध्ये आव्हान दिले. त्यांनी आपण मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला व त्याचे पुरावेही सादर केले. मॅटचे न्यायीक सदस्य हिंगणे यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना आरोग्य संचालकांच्या आदेशाला स्थगनादेश दिला. तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे, अ‍ॅड. सुनील पांडे यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड. ए. पी. ताथोड यांनी बाजू मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay on action taken over doctors