सांगली-कोल्हापूर महामार्गालगत धर्मनगरजवळ जनावरांच्या मांसापासून खत तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होत आहे. तसेच परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. यामुळे हा कारखाना त्वरित बंद करावा, अशी मागणी चिपरी, निमशिरगाव, कोंडिग्रे येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.     
मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कारखाना बंद करण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस चिपरीचे सरपंच बबन यादव, निमशिरगावच्या सरपंच प्रतिभा पाटील, बाहुबली महाराज मुनीसंघ सेवा समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, के. एस. पाटील, सुदर्शन पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश मलमे, मनसेचे अमित शहा आदी प्रमुख उपस्थित होते.    
हौसाबाई मगदूम स्कूलसमोर असणा-या कारखान्यात जनावरांचे मांस आणून खत तयार करण्यात येते. यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण होत असून, धर्मनगर या धार्मिक क्षेत्राचे पावित्र्य नष्ट होत असल्याचे या वेळी प्रास्ताविकात के. एस. पाटील म्हणाले. या कारखान्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा वाहनधारकांबरोबरच परिसरातील शाळेतील विद्यार्थी व धर्मनगर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचे मुनी, श्रावक यांना त्रास होत आहे. हा कारखाना बंद करण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन प्रशासनास १५ दिवसांची मुदत देऊ. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यास कारखाना उद्ध्वस्त करण्यास शिवसैनिक पुढे असतील असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Story img Loader