पालिकेच्या बांधकामासाठी ठेकेदाराकडून मोठय़ा प्रमाणात होणारी वीजचोरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पकडली. पालिकेच्या बांधकामासाठीच चोरून वीज वापरण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गालगत बौध्द विहारामागे कत्तलखाना बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका पालिकेने महेश जाजू यांना दिला असून गेल्या वर्षभरापासून हे बांधकाम चालू असून या कामासाठी मोठय़ा प्रमाणात वीज लागते. ठेकेदार जाजू यांनी येथे एक वीज जोडणी घेतली असून त्यावर काही प्रमाणात वीज भार वापरला जात होता. मात्र हा वीजजोड केवळ दिखाव्यासाठीच होता. त्याच्या जवळूनच अनधिकृरीत्या तेथे दुसरा वीज जोड घेत त्यावरुन दररोज जवळपास अडीच हजार किलोवॅट एवढा वापर सुरु असल्याचे पथकाला आढळून आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अशोक रागीर आणि आसिफ पठाण यांनी या वीजचोरीची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर कार्यकारी अभियंता गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता संदीप शिंदे, डी. टी. जोशी आणि कल्पना गुरव यांच्या पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास येथे छापा टाकला. पथकाने या ठिकाणाहून लॅपटॉप, सीएफएल बल्ब, हॅलोजन, पाण्यासाठीची मोटार आणि कटींग मशिन ताब्यात घेतले. दरम्यान, संबंधित ठेकेदार जाजू यांनी पठाण यांच्यासह किशोर चव्हाण आपल्याला ब्लकमेल करीत असल्याचे सांगत त्यांनी मला त्रास देण्यासाठी हे उद्योग चालविले आहे. तसेच पथकाने पकडलेल्या वीज चोरीशी आपला काहीही संबंध नसून आपल्याकडील परप्रांतीय कामगारांनी ही वीज चोरी केली आहे असे सांगितले. तर पठाण यांनी ठेकेदाराची वीजचोरी पकडून दिल्याने ते निराधार आरोप करीत असून आपण त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
ठेकेदारावर पदाधिकाऱ्यांची मेहेरनजर
ठेकेदार महेश जाजू यांनी संगमनेर नगरपालिकेची कामे घेताना अनेक कामे अपूर्ण ठेवल्याने पालिकेच्या एका बैठकीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचीदेखील चर्चा झाली होती. पालिकेच्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट सोडून देऊनही या कामांची बिले त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. असे असतानाही या ठेकेदाराची कामे बिनदिक्कतपणे सुरु आहेत. त्यामुळे कामे अर्धवट सोडणाऱ्या या ठेकेदारावर पालिकेतील सत्ताधारी पक्षाची मेहेरनजर असल्याचे समोर आले.