कामगारांच्या पगाराची लोकलमध्ये हरवलेली पिशवी रेल्वे पोलिसांच्या तप्तरतेमुळे प्रवाशाला परत मिळाली आहे. भिवंडीतील एका खासगी कंपनीत रूपेशकुमार ढवळे व्यवस्थापक पदावर काम करतात. भांडुप येथून कामगारांच्या पगाराची एक लाखाची रक्कम पिशवीत घेऊन ते लोकलने कल्याणच्या दिशेने येत होते. पिशवीत बँकेची एटीम कार्ड, ओळखपत्र व इतर कागदपत्रे होते. डोंबिवली रेल्वे स्थानकात येताच ढवळे यांना आपली रॅकवर ठेवलेली पिशवी हरविली असल्याचे लक्षात आले. त्यांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाने कल्याण रेल्वे पोलीस अनिल जगदाळे, नाना कसबे यांना रात्रीची साडेदहा वाजताची छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कल्याणला येणारी लोकल तपासण्याचे सूचित केले. त्याप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकात गाडीची तपासणी करीत असताना अहमद साकवी या प्रवाशाने या पिशवीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही पिशवी ढवळे यांना परत केली. यापूर्वी पोलीस जगदाळे यांनी लोकलमध्ये हरवलेली सहा तोळे सोन्याची पिशवी एका महिलेला परत केली होती.

Story img Loader