लोकल गाडय़ा तसेच एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरटय़ांचा शोध लावत ठाणे रेल्वे पोलिसांनी सुमारे ११ गुन्हे उघडकीस आणले असून या चोरटय़ांकडून सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान ठाणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करून चोरटय़ांकडून जप्त केलेला ऐवज प्रवाशांना परत केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कामगिरीविषयी दागिने परत मिळालेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
लोकल गाडय़ा तसेच एक्स्प्रेसमधून प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार मध्यंतरी वाढू लागले होते. तसेच या घटनांमध्ये चोरटय़ांकडून महिला प्रवाशांना लक्ष्य केले जात होते. चोरटय़ांच्या उपद्रवामुळे प्रवासी वर्ग हैराण झाला होता. त्यामुळे ठाणे रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत जाधव यांनी चोरटय़ांच्या शोधासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्यामध्ये रेल्वे पोलिसांच्या पथकाने २०११ ते १३ या दोन वर्षांच्या कालावधीत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ११ गुन्ह्य़ांचा छडा लावून सुमारे तीन लाख ४२ हजार ६३० रुपयांचा ऐवज चोरटय़ांकडून जप्त केला.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये दीपिका कदम, मधुरा गोडबोले, जय रवी नायर, सुरेखा निकम, कामिनी काटे, वैजयंती मुंडे, फातिमा कादरी, शुभांगी मसुरकर, सुनीता सिंग, रहेमत अन्वरअली फक् की, शबाना खत्री अशा ११ प्रवाशांना त्यांचे चोरीस गेलेले दागिने परत करण्यात आले. या गुन्ह्य़ांमध्ये सुमारे तीन लाख ५३ हजार ७४४ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता, त्यापैकी तीन लाख ४२ हजार ६३० रुपयांचा ऐवज चोरटय़ांकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून हा ऐवज प्रवाशांना परत करण्यात आला.